सोलापूर येथे होणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार!

 सोलापूर येथे होणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार!

पुणे दि ३ : सोलापूर येथे दिनांक २८ आणि २९ मार्चला चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार असून निर्झरा केअर फाऊंडेशन, सोलापूर या संस्थेकडे स्पर्धेचे संयोजनपद देण्यात आले आहे. या स्पर्धेत ४२ जिल्ह्यांच्या संघांचे ४००हून अधिक खेळाडू सहभागी होणार असून महिला महाराष्ट्र केसरी किताबासाठी भाग्यश्री फंड ही प्रमुख दावेदार आहे. यापूर्वी तिने तीन वेळा हा किताब जिंकला होता.

निर्झरा केअर फाउंडेशनच्या संचालिका आणि संस्थापक स्वाती अळ्ळीमोरे-साखरे, केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, संघाचे सरचिटणीस योगेश दोडके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही स्पर्धा सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर पेठ परिसरात असलेल्या हरीभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे.

या स्पर्धेसाठी ५० किलो, ५३ किलो, ५५ किलो, ५७ किलो, ५९ किलो, ६२ किलो, ६५ किलो, ६८ किलो, ७२ किलो तसेच महाराष्ट्र केसरी गट (६५ ते ७६ किलो) असे वजनी गट ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके दिली जाणार असून महाराष्ट्र केसरी किताब जिंकणाऱ्या महिला कुस्ती केलेला मानाची गदा देऊन गौरविण्यात येणार आहे. तीन वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या भाग्यश्री हिच्यापुढे अमृता पुजारी, प्रगती गायकवाड, अंकिता फटाले, वेदांतिका पवार यांचे आव्हान असणार आहे. भाग्यश्रीने स्पेनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या २० वर्षांखालील गटाच्या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच थायलंडमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. गतवेळच्या महाराष्ट्र केसरी जेतेपदाच्या लढतीत भाग्यश्रीने अमृताला पराभूत करीत विजेतेपद मिळवले होते.

“पुरुषाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची दरवर्षी महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात मोठी उत्सुकता असते. तशीच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धासुद्धा आपली छाप पाडते आहे. वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी निर्झरा केअर फाऊंडेशनच्या माध्यमातून चौथी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली आहे. मी आणि आमची संघटना या आयोजनासाठी त्यांच्या सर्वतोपरी पाठीशी असू. तसेच मी या स्पर्धेला आवर्जून हजेरी लावेन,” असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

स्वाती यांचे वडील सिद्धाराम साखरे हे स्वतः ज्येष्ठ कुस्तीपटू, पोलीस अधिकारी व समाजसेवक होते. त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी निर्झरा केअर फाऊंडेशनची २०२३ मध्ये स्थापना केली. स्वाती अळ्ळीमोरे-साखरे म्हणाल्या की, “सोलापूर जिल्ह्यामध्ये कुस्तीसाठी चांगले नैपुण्य आहे. मात्र अव्वल दर्जाच्या सुविधा, आखाडे व स्पर्धांचे व्यासपीठ याअभावी या खेळाडूंना अपेक्षेइतके आंतरराष्ट्रीय दर्जाचे करिअर करता येत नाही, हे लक्षात घेऊनच आम्ही निर्झरा फाउंडेशनतर्फे कुस्तीगिरांच्या विकासासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ही महिलांची राज्य अजिंक्यपद स्पर्धा घेत आहोत.”ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *