राज्यपालांकडून महाराष्ट्र NCC चमूला शाबासकी

 राज्यपालांकडून महाराष्ट्र NCC चमूला शाबासकी

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विकसित देशांमधील लोकांमध्ये सार्वजनिक जीवनात शिस्त आणि नागरी कर्तव्याप्रती जागरुकता दिसून येते. त्यामुळे विकसित भारताचे उद्दिष्ट गाठताना, सर्वांनी शिस्त तसेच नियमांचे पालन करणारे जबाबदार नागरिक झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केले.

महाराष्ट्र एनसीसीच्या चमूने नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत सलग तिसऱ्यांदा प्रतिष्ठेचे पंतप्रधानांचे ध्वज-निशाण आणि सर्वोत्कृष्ट चॅम्पियनशिप चषक पटकावल्याबद्दल राज्यपाल बैस यांनी एनसीसीच्या सर्व सदस्यांचा महाराष्ट्र राजभवन येथे सत्कार केला, त्यावेळी ते बोलत होते.

आपण स्वतः एनसीसीचे ‘सी’ प्रमाणपत्र धारक असून एनसीसी मध्ये देशभक्ती आणि शिस्तीचे संस्कार बिंबवले जातात. प्रत्येक विद्यार्थ्याने एनसीसी – राष्ट्रीय सेवा योजना यांसारख्या राष्ट्रीय संघटनेमध्ये गेले पाहिजे आणि जीवनात स्वावलंबी झाले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

विदेशात गेल्यावर लोक चॉकलेटचे आवरण खिशात ठेवतात आणि योग्य वेळी कचरापेटीत टाकतात. आपल्याकडे मात्र अनेकदा लोक कचरा वाटेल तेथे टाकतात, वाहतुकीच्या सिग्नलचे उल्लंघन करतात तसेच कित्येकदा रेल्वे क्रॉसिंग बंद असताना फाटक ओलांडून जातात. याकरिता शिस्त बाणवणे आवश्यक आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

देश पारतंत्र्यात असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र भूमीने परकीय शक्तींचा संपूर्ण शक्तीनिशी प्रतिकार केला होता. आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने अग्रेसर होत आहे. भारत जगातील सर्वाधिक युवा राष्ट्र झाले आहे. युवक राष्ट्रकार्यात कसे सहभागी होतात यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे असे सांगून एनसीसी कॅडेट्सनी आपण निवडलेल्या प्रत्येक क्षेत्रात समाजाला नेतृत्व प्रदान करावे असे आवाहन राज्यपालांनी केले.

यावेळी राज्यपालांनी प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये आयोजित विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण, रजत आणि कांस्य पदक प्राप्त करणाऱ्या कॅडेट्सना कौतुकाची थाप दिली.

२३ वेळा बॅनर ; चार वेळा हॅटट्रिक

महाराष्ट्र एनसीसीने आजवर २३ वेळा पंतप्रधानांचे बॅनर प्राप्त केले आहे तसेच चार वेळा हे बॅनर ओळीने तीन वेळा जिंकून हॅटट्रिक केली असल्याचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितले. एनसीसी प्रशिक्षण पूर्ण केलेले अनेक युवक सैन्यदलात भरती झाले असून यावर्षी अनेक जण ‘अग्निवीर’ म्हणून सैन्यदलात रुजू झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कर्नल एम. देवैया मुथप्पा, ब्रिगेडियर विक्रांत कुलकर्णी तसेच तिन्ही सैन्य दलातील अधिकारी आणि १२२ कॅडेट्स उपस्थित होते.

महाराष्ट्र NCC ने जिंकलेल्या ट्रॉफी

  1. पंतप्रधान चॅम्पियनशिप ट्रॉफी
  2. पंतप्रधान चॅम्पियनशिप बॅनर
  3. सर्वोत्तम नौदल युनिट ट्रॉफी
  4. सर्वोत्कृष्ट कॅडेट सीनियर डिव्हिजन एअर विंग गर्ल्स ट्रॉफी
  5. पीएम रॅली मार्च पास्ट मधील सर्वोत्तम पथक
  6. ‘टेंट पेगिंग’मध्ये सर्वोत्कृष्टते साठी ‘रूप ज्योती करंडक’

Maharashtra Governor pats NCC Cadets for bringing PM Banner for 3rd consecutive year

ML/KA/SL

1 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *