कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, 564 लोकांचे स्थलांतर

सांगली दि २१– सततच्या पावसामुळे तसेच कोयना धरणातून वाढविण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आता पर्यंत सांगलीतील 113 कुटुंबातील 564 लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर मिरजेत कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. मिरज येथील स्मशानभूमीत पाणी शिरले आहे. तसेच कुरणे मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याचा संपर्क तुटला असून काही 100 जनावरे बाहेर काढून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आली आहेत.
संभाव्य पूरस्थितीचा विचार करून सांगलीत एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली
आहे. प्रशासनाकडून नागरिकांना नदीकाठच्या धोकादायक भागात जाणे टाळावे, सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या पूर परिस्थिती अनुषंगाने सर्व स्थिती नियंत्रणात आहे. 100 जनावरांची स्थलांतरण करण्यात आलेले आहे. योग्य पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. नागरिकांना घाटापासून दूर राहणे, तसेच स्टंटबाजी करू नये आणि हुल्लडबाजी करू नये या बाबत सूचित करण्यात आलेले आहे.ML/ML/MS