कोपर्शी चकमकीतील मृतांमध्ये दोन मोठ्या नक्षल कॅडरचा समावेश
गडचिरोली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील भामरागड तालुक्यातील कोपर्शी गावानजीकच्या जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ५ नक्षली ठार झाले. सर्वांची ओळख पटली असून, त्यात दोन मोठ्या कॅडरचा समावेश असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
मृत नक्षल्यांमध्ये ३ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. जया उर्फ भुरी पदा(३१) (छत्तीसगड) आणि सावजी उर्फ अंकलू तुलावी(६५) जि.गडचिरोली हे दोन मोठे कॅडर ठार झाले आहेत. जया उर्फ भुरी पदा ही कंपनी क्रमांक १० ची, तर सावजी तुलावी हा सप्लाय टीमचा डीव्हीसीएम आहे. जयाची नुकतीच उत्तर गोंदिया-
गडचिरोली विभागाची कमांडर इन चीफ पदावर नियुक्ती करुन तिला त्या भागात पाठविण्याची तयारी सुरु होती. दोघांवरही प्रत्येकी १६ लाख रुपयांचे बक्षीस होते.
अन्य तीन मृतांमध्ये देवे उर्फ रिता(२५)रा.बस्तर(छत्तीसगड), बसंत रा. बस्तर(छत्तीसगड) , सुखमती रा.बस्तर(छत्तीसगड) यांचा समावेश आहे. देवे आणि बसंत हे सप्लाय टीमचे सदस्य होते. सुखमती ही कंपनी क्रमांक १० ची सदस्य असून, दंडकारण्य स्पेशल झोनचा सदस्य रुपेश मडावी याची अंगरक्षक होती. या तिघांवर प्रत्येकी २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.
ML/ML/PGB
22 Oct 2024