पावसाळी प्रवास सुरक्षित करण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज

 पावसाळी प्रवास सुरक्षित करण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डोंगर दऱ्यांतून वाट काढत ७४० किलो मिटरचे अंतर पार करणाऱ्या कोकण रेल्वेचे पावसाळ्यातील व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. कोकणात पडणारा प्रचंड पाऊस, चिंचोळ्या मार्गावरून एक बाजूस दरी तर दुसऱ्या बाजूस उंच कड्यांवरून धोधो वाहणारे पावसाचे पाणी यांतून प्रवाशांना सुखरूप पार करण्याचे काम कोकण रेल्वने व्यवस्थापनाने उत्तमपणे पार पाडले आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वीच खबरदारीचे उपाय म्हणून या रेल्वे मार्गावर विशेष काळजी घेतली जाते. यावर्षी कोकण रेल्वेनं पावसामुळं होणारं नुकसान टाळण्यासाठी ६७३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. घाटात अतिमुसळधार पावसानं निर्माण होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी लोको पायलटला सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळी कामांच्या योग्य नियोजनामुळे गेल्या दहा वर्षांत कोकण रेल्वेवर मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतूक खोळंबलेली नाही.

पावसाळ्यात अनुचित घटना टाळण्यासाठी ६७३ प्रशिक्षित रेल्वे कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. घाटात अतिमुसळधार पावसामुळे दृष्यमानता खालावून होणारे अपघात टाळण्यासाठी ४० किमीप्रतितास सुरक्षित वेगाने गाड्या चालवण्याच्या सूचना सर्व लोकोपायलटला कोकण रेल्वेने दिलेल्या आहेत. रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियंत्रण कक्ष आणि स्थानकांशी अतूट संपर्क राखण्यासाठी मोबाइल फोन देण्यात आले आहेत. मेल-एक्स्प्रेसच्या लोकोपायलट आणि गार्डला वॉकी-टॉकी देण्यात आले आहेत. आपत्कालीन स्थितीत माहिती पुरवण्यासाठी एक किलोमीटर अंतरावर आपत्कालीन संवाद केंद्र (ईएमसी) स्थापित करण्यात आले आहे. सर्व मुख्य सिग्नल एलईडीमध्ये रूपांतर करण्याचे काम पूर्ण झाल्याने धुक्यांमध्ये सिग्नल अधिक चांगले दिसणार आहेत.

१० जून ते ३१ ऑक्टोबर दरम्यान पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल होणार आहेत. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्याआधी www.konkanrailway.com यावर भेट द्यावी किंवा १३९ वर संपर्क साधावा, असे आवाहन कोकण रेल्वेच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे उपमहाव्यवस्थापक गिरीश करंदीकर यांनी केले आहे.

कोकणातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यास त्याची माहिती कोकण रेल्वे नियंत्रणात कक्षात मिळणार आहे. अशी पूर इशारा यंत्रणा तीन ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आहे.

  • काळी नदी (मानगाव आणि वीर )
  • सावित्री नदी (वीर आणि सापे वामणे)
  • वशिष्टी नदी (चिपळूण आणि कामथे)

रत्नागिरी ते निवासरदरम्यान वाहणाऱ्या हवेचा वेग मोजण्यासाठी पनवेलमध्ये वायूवेग यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. थिविम आणि करमाळीसाठी मांडवी पुलावर, करमाळी आणि वेरणासाठी झुआरी पुलावर, होनावर आणि मनकीसाठी शरावती पूलावर वायुवेग यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. वाऱ्याचा वेग वाढल्यास त्याबाबत माहिती नियंत्रण कक्षाला तातडीने मिळणार आहे.

थोडक्यात पावसाळी प्रवास सुसह्य व्हावा यासाठी सर्वतोपरी सज्ज होत, कोकण रेल्वे आता मान्सूनला सामोरे जाण्यास सज्ज झाली आहे.
SL/KA/SL
8 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *