ओव्हर हेड वायर तुटल्याने कोकणरेल्वे सेवा विस्कळीत

सिंधुदुर्ग, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज सकाळी दहाच्या सुमारास आडवली येथे ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक गाड्या दीड ते दोन तासांपेक्षा अधिक काळ विविध रेल्वे स्थानकावर अडकून पडल्या होत्या. मुंबई – मडगाव – मांडवी एक्स्प्रेस संगमेश्वर येथे दीड तासापासून उभी होती, तर मडगाव- मुंबई- मांडवी एक्स्प्रेस रेल्वे गाडी वैभववाडी येथे दीड तासांपासून थांबलेली होती.मुंबई – मडगाव- तेजस एक्स्प्रेस रेल्वे गाडी दोन तासांपासून रत्नागिरी येथे उभी होती . जनशताब्दी अडीच तासांपासून आडवली येथे थांबवून ठेवण्यात आली होती. वायर जोडण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे असे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दुपारी बाराच्या सुमारास सांगितले होते. त्यानंतर दोन वाजता वाहतूक हळू हळू पूर्ववत सुरू झाली आहे मात्र गाड्या काहीशा विलंबाने धावत आहेत.
ML/ML/SL
4 Jan. 2025