कोल्हापुरी चपलेला मिळाला ‘क्यूआर कोड, बनावट करणाऱ्यांना बसणार चाप
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या विविध भागात होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचे वेगळेपण कायम रहावे यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करून विविध उपाययोजना केल्या जाता.शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने (लिडकॉम) ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी केला आहे. कोल्हापुरी चपलेस ‘क्यूआर कोड’ दिला आहे. तसेच चपलेच्या आत ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित एक छोटी चीप बसवली आहे. ही चप्पल मोबाईलने स्कॅन करताच ती कुठे कोणत्या कारागिराने बनवली, याची माहिती मिळेल. त्यामुळे बनावट कोल्हापुरी चप्पल बनविणाऱ्यांना चाप बसेल. चांगली कोल्हापुरी चप्पल ग्राहकांना मिळावी, यासाठी ‘लिडकॉम’ने ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित नवीन चपला विक्रीसाठी बाजारात आणल्या आहेत. हा प्रयोग यापूर्वी महाराष्ट्रात नाशिक येथील सह्याद्री फार्म येथील विविध प्रकारच्या फळभाज्यांबरोबरच कापूस, रबरच्या विक्रीमध्ये केला गेला आहे.
‘लिडकॉम’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय मुंबई येथे आयोजित चर्मवस्तु प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. कोल्हापुरी चपलांकरिता ब्लॉक चैन अंतर्गत ‘क्यूआर कोड’ प्रणालीचे अनावरण राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनास उस्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. १ मार्च २०२४ पर्यंत प्रदर्शन व विक्री सुरू राहील.
या वेळी आमदार सरोज आहिरे, कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, ‘लिडकॉम’चे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये, चर्मकार महासंघाचे अध्यक्ष संजय खामकर, ‘हिंदुस्थान ॲग्रो’चे डॉ. भारत ढोकणे पाटील आदी उपस्थित होते.सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे म्हणाले, ‘‘सामाजिक न्याय विभागातर्फे एक लाख उमेदवारांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातील २५ हजार उमेदवारांना प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन होत आहे. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी विविध केंद्र व राज्यशासनाच्या योजना राबविल्या जात आहेत.’’
SL/KA/SL
4 March 2024