आदिशक्ती अंबाबाईच्या जागरास कोल्हापूर सज्ज
कोल्हापूर, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ कोल्हापुरातील आदिमाया, आदिशक्ती करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून मंगलमयी वातावरणात घटस्थापनेनं प्रारंभ झाला. सकाळी साडेआठ वाजता तोफेच्या सलामीने अंबाबाईची घटस्थापना झाली.
आज सकाळी साडेआठ वाजता श्रीपूजकांचे मूळ घराणे मुनिश्वर यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर शासकीय अभिषेक घालण्यात आला. दुपारी साडेबाराच्या आरतीनंतर देवीची सालंकृत रूपातील पूजा बांधली गेली. रात्री साडेनऊ वाजता पालखी सोहळा होईल. यानिमित्त रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक आरासाने आणि विद्युत रोषणाईने मंदिराचं सौंदर्य अधिकच खुललं आहे.
उत्सवाच्या पूर्वसंध्येला राज्यातील विविध जिल्ह्यांमधून देवीची ज्योत नेण्यासाठी आलेल्या भाविकांनी, तिच्या जयघोषानं देवीच्या जागराला सुरुवात केली. अंबाबाईचा नवरात्रोत्सव म्हणजे देशभरातील भाविकांसाठीचे श्रद्धास्थान. अंबाबाईच्या जागराच्या
या काळात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक ,आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा आदी राज्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.
कोल्हापूरच्या स्वप्निल हिडदुगी यांच्या वतीने अंबाबाई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
झेंडूच्या फुलांच्या माळा, देशीविदेशी जातीचा फुलोत्सव येथे रंगला आहे. यासह मंदिराची शिखरे, भवानी मंडप, प्रवेशद्वाराच्या कमानी, दगडी भिंती, यावरील आकर्षक रंगसंगतीच्या विद्युत रोषणाईने मंदिर अधिकच सुंदर झाले आहे. जुना राजवाडा परिसरातील शेतकरी बझार इमारतीपाशी सायंकाळी बॅरिकेडस लाऊन दर्शन रांगा तयार करण्यात आल्या. येथे पिण्याचे पाणी,
स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह, लाइट, फॅन अशा सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत. तसेच, भाविकांना
अंबाबाईचे थेट दर्शन व्हावे, यासाठी मोठा एलइडी स्क्रीन बसविण्यात आला आहे. परिसरावर सीसीटीव्हींचा
वॉच असेल. भाविकांची काळजी देवस्थान समितीने भाविकांची सर्वतोपरी काळजी घेत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह,ठिकठिकाणी हिरकणी कक्ष अशा सोयी निर्माण केल्या आहेत. बाह्य परिसरात प्रथमोपचार केंद्र, पोलिस कंट्रोल रूम, आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारला आहे. परिसरावर अत्याधुनिक सीसीटीव्हींचा वॉच असेल.
ML/ML/SL
3 Oct 2024