कोल्हापुरात अन्नातून ६०० जणांना विषबाधा….
कोल्हापूर, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी इथं ग्रामस्थांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली असून बाधित रुग्णांची संख्या 600 च्या पुढे गेली आहे. तात्पुरते रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 420 तर औषधोपचार घेऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या सुमारे 180 च्या पुढे आहे.
मंगळवारी मध्यरात्रीपासून अनेकांना पोट दुखी , जुलाब आणि उलट्या होण्यास सुरुवात झाली. पहाटेपर्यंत रुग्ण संख्या झपाट्याने वाढल्याने गावात खळबळ उडाली. आरोग्य यंत्रणा तातडीने सक्रिय झाली असून विद्यामंदिर इथे तात्पुरते आरोग्य केंद्र सुरू करून उपचार दिले जात आहेत. याशिवाय अनेक रुग्णांनी खाजगी रुग्णालयांमध्येही उपचार घेतले आहेत.
सद्यस्थितीत 48 जणांवर इचलकरंजी इथल्या आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून लहान मुलांची संख्या मोठी असल्याचं समोर आलं आहे.
शिवनाकवाडी इथल्या विष बाधेचं मूळ कारण शोधण्यासाठी अन्न आणि पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी पिल्यानं विषबाधा झाली असावी असा अंदाज आहे. तपासणीसाठी प्रयोगशाळेत नमुने पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर कारण स्पष्ट होईल असं जिल्हा अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी दीपा फावडे यांनी सांगितलं.
ML/ML/PGB 6 Feb 2025