वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांचा अखेर राजीनामा
मुंबई दि १८ : मंत्रिमंडळातील समावेशापासूनच वादग्रस्त ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री एडवोकेट माणिकराव कोकाटे यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. सरकारची कागदपत्रातून फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती, मात्र उच्च न्यायालयात धाव घेत त्यांनी मंत्रिपद वाचवण्याचा प्रयत्न केला होता. अखेर टीकेची झोड उठताच त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे .
माणिकराव कोकाटे यांना गेल्या वर्षी मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून त्यांच्याकडे कृषी खाते देण्यात आले होते. मात्र त्यांनी शेतकऱ्यांबद्दल आणि सरकार बद्दल सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःला चांगलेच अडचणीत आणले होते. सरकारची प्रतिमा देखील मलीन करण्याचे काम त्यांच्या हातून घडले होते, यामुळे अखेर त्यांचे खाते बदलून कृषी खाते हे दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आले होते, तर भरणे यांचे कडील युवक कल्याण आणि क्रीडा हे खाते कोकाटे यांना देण्यात आले. यामुळे त्यांचे मंत्रिपद वाचले तरी कमी महत्त्वाचे खाते त्यांना देण्यात आले होते.
कोकाटे यांनी बनावट कागदपत्रे तयार करून सरकारी सदनिका लाटल्याचा आरोप त्यांच्यावरती होता. त्याप्रकरणी यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेत या शिक्षेला स्थगिती मिळवली होती, यामुळे त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद वाचले होते. मात्र या महिन्यात 16 तारखेला सत्र न्यायालयाने शिक्षेला दिलेली स्थगिती उठवून ही शिक्षा कायम केल्यामुळे कोकाटे चांगलेच अडचणीत आले होते. तरीही त्यांनी आमदारकीचा आणि मंत्रीपदाचा राजीनामा दिला नव्हता. यावरून माध्यमांमधून आणि राजकीय दृष्टीने जोरदार टीकेची झोड उठवण्यात आली. त्यानंतर कोकाटे यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविला होता आणि स्वतः रुग्णालयात दाखल झाले होते. याच दरम्यान त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन आपले पद टिकवण्याचा प्रयत्न देखील केला होता. उद्या यावर सुनावणी अपेक्षित आहे .
चहुबाजुंनी होत असलेली टीका आणि पक्षाची तसेच सरकारची मलीन होत असलेली प्रतिमा लक्षात घेऊन अजित पवार यांनी अखेर कोकाटे यांचा हा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला. त्यानंतर फडणवीस यांनी आज सायंकाळी उशिरा हा राजीनामा राज्यपाल देवव्रत आचार्य यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला आहे ,या दरम्यानच्या काळात कोकाटे बिन खात्याचे मंत्री होते. कोकाटे यांच्या राजीनामा प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हे दुसरे मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर पडले आहेत. गेल्या वर्षभरात आधी धनंजय मुंडे आणि आता माणिकराव कोकाटे अशा दोन मंत्र्यांना त्यांच्या वादग्रस्त कामगिरीमुळे राजीनामा द्यावा लागला आहे.ML/ML/MS