पाऊस का आणि कुठे थांबलाय , जाणून घ्या

 पाऊस का आणि कुठे थांबलाय , जाणून घ्या

मुंबई,दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर दरवर्षी अगदी वेळेत दाखल होणारा मान्सून यावर्षी मात्र दडी मारून बसला आहे. केरळमध्ये वेळेच्या चार दिवस उशीरा दाखल झाल्याने त्याचा पुढील मार्ग रखडला मात्र आता बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस अधिकच लाबल्याचे दिसत आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमधून राजस्थानात गेले. सध्या हे चक्रीवादळ राजस्थान, पाकिस्तानच्या काही भागात आहे. अन् ते कमकुवत झाले आहे. तसेच पुढच्या ६ तासात अजून कमकुवत होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या चक्रीवादळाने मान्सूनवर परिणाम केला आहे. राज्यात मान्सून ११ जून रोजी कोकणात दाखल झाला होता. त्यानंतर १५ जूनपर्यंत मान्सून राज्यभर पोहचणार होता. परंतु मान्सून अजूनही सक्रीय झालेला नाही. तो थांबला आहे. त्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

राज्यातील मान्सूनची प्रगती सध्या थांबली आहे. मान्सून रत्नागिरीतच थांबला असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत दिली आहे. परंतु चांगली बातमी म्हणजे दक्षिण द्विपकल्पातील काही भागांमध्ये आणि पूर्व भारतातील काही भागांमध्ये १९-२२ जूनपर्यंत मान्सूनची प्रगती होणार आहे. मान्सून सध्या रत्नागिरीतच रुसून बसला आहे. यामुळे राज्यभरातील त्याचा पुढचा प्रवास थांबला आहे. शनिवारीसुद्धा मान्सूनची काही प्रगती झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

या वर्षी पावसाने दडी मारल्याने शेतीच्या कामाला विलंब होण्याची शक्यता आहे. अनेक भागात विहिरी सुद्धा कोरड्या पडल्या आहेत. काही वेळेला विहिरींचे पाणी वापरून सुध्दा जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणात पेरण्या होतात. यावर्षी विहिरींना पाणी नसल्याने पेरणी झाली नाहीय.

SL/KA/SL

17 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *