स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाच्या मीटिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि २९
स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाची कार्यकारिणीची बैठक नुकतीच महालक्ष्मी येथे जल्लोषात पार पडली. या बैठकीमध्ये महासंघाचे अध्यक्ष गजानन कीर्तिकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच महासंघाच्या वतीने पुढे करण्यात येणाऱ्या विविध आस्थापनेतील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याबाबत मार्गदर्शन केले. यामध्ये ICICI बँकेतील महाराष्ट्रातील सुमारे ७०० हंगामी कामगारांना महासंघाने वेतनवाढ दिली. परंतु आरोग्य विमा योजनेचे लाभ मिळणे बंद झाले आहेत. सदर कर्मचारी बँकेत २५ वर्षे कार्यरत आहेत. त्यांना आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ICICI बँकेच्या व्यवस्थापनाशी महासंघातर्फे चर्चा करणे.
तसेच मुंबई विद्यापिठातील १०८ हंगामी कर्मचा-यांना तोंडी निर्देश देऊन तडकाफडकी सेवेतून कमी करण्यात आले. त्यांना न्यायालयाने पुनःश्च सेवेत समाविष्ट करण्याचे आदेश देऊनही विद्यापीठ प्रशासन सेवेत घेण्यास तयार नाही. सदर कैफियत मुंबई विद्यापिठाचे कुलपती म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय यांचेपर्यंत उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून विषय मांडून या कर्मचा-यांना सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सुमारे २२ हजार सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या या महत्वाच्या सुरक्षा मंडळाची रचना अजूनही करण्यात आलेली नाही. सुरक्षा रक्षकांना ४ महिने वेतन दिले जात नाही. त्यावर सुरक्षा रक्षक मंडळ कोणतीही कार्यवाही करीत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कामगार मंत्र्यांकडे या विषयाचा पाठपुरावा करणे.वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे, कोकण रेल्वेमध्ये कंत्राटी पध्दतीवर काम करणारे कर्मचा-यांचे वेतन बँकेत जमा होते. परंतु कंत्राटदारा मार्फत कर्मचा-यांचे ए.टी.एम. कार्ड आपल्या ताब्यात ठेऊन त्यांच्या वेतनातील काही रक्कम अगोदरच काढून घेण्यात येते. या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून ही अन्यायकारक पध्दत बंद करण्याची मागणी करणे.
तसेच माझगांव डॉक आस्थापनेमध्ये 3500 फिक्स टर्म कामगार मागील 16 वर्षांन पासून कार्यरत आहेत. आज ह्या सर्व कामगारांची वय 40-50 झाली. माझगाव डॉक मधील अॅडमिरल पदाचे नेव्हल अधिकारी लक्ष देत नाहीत. संरक्षण खाते लक्ष देत नाही. याबाबत माझगांव डॉक समोर लोकाधिकार सेना महासंघाच्या मार्फत निदर्शने करणे. तसेच जे जे रुग्णालय येथील हंगामी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याबाबत रुग्णालयातील आस्थापनाशी चर्चा करणे अशा विविध विषयावर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये महासंघाचे सरचिटणीस अरुण मोरे, उपाध्यक्ष देवा कदम, रवी भिलारे, दीपक काळींगण तर चिटणीस सुप्रिया करंडे, विजय परब, सचिन कदम ,निलेश बुरुनकर आणि करण ठाकूर उपस्थित होते. KK/ML/MS