किन्नर उपचारासाठी स्वतंत्र कक्षाचा प्रश्न मार्गी लागणार.

 किन्नर उपचारासाठी स्वतंत्र कक्षाचा प्रश्न मार्गी लागणार.

मुंबई, सोमवार, दिनांक ७/७/२०२५ रोजी
राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मा. श्री. प्रकाशजी आबिटकर यांची आज विधान परिषद सदस्य मा. आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी मंत्रालयात भेट घेतली. या भेटीत किन्नर (ट्रान्सजेंडर) समुदायासाठी राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष (वाॅर्ड) स्थापन करण्याबाबत महत्वपूर्ण विषय उपस्थित करण्यात आला.
या चर्चेदरम्यान, ठाणे जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. कैलास पवार आणि आमदार ॲड. डावखरे यांनी मंत्री महोदयांसमोर वास्तव स्पष्ट करत सांगितले की, किन्नर व्यक्ती समाजातील एक अत्यल्प प्रमाणात दिसणारा पण महत्त्वाचा घटक आहे. सामाजिक मानसिकतेतील संकोच, लाज, व भीतीमुळे बहुतेक वेळा या व्यक्ती स्वतःची ओळख लपवतात. जेव्हा त्या आजारी पडतात किंवा गंभीर व्याधींनी ग्रस्त होतात, तेव्हा सामान्य रुग्णालयांमध्ये त्यांच्यासाठी कोणतीही खास वैद्यकीय सोय उपलब्ध नसते.
हे वास्तव लक्षात घेता, सेवा भारती कोकण प्रांत, जनतेचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि खुद्द पीडित समुदायाच्या विनंतीनुसार ही मागणी करण्यात आली. या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देताना मा. श्री. प्रकाशजी आबिटकर यांनी ठाणे जिल्हा रुग्णालयात लवकरात लवकर किन्नर समुदायासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे आश्वासन दिले, तसेच त्यानुसार योग्य त्या कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर आदेश निर्गमित करण्यात येतील, असेही स्पष्ट केले.
या निर्णयामुळे किन्नर समाजाच्या आरोग्यविषयक गरजांकडे शासनाचे लक्ष वेधले गेले असून, यामुळे त्यांच्या उपचाराची प्रक्रिया सुलभ व सन्मानजनक होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्यमंत्री म्हणून मा. श्री. प्रकाशजी आबिटकर यांनी या दुर्लक्षित घटकासाठी विशेष लक्ष देत घेतलेला त्वरित निर्णय ही एक समाजहिताची दिशादर्शक कृती असल्याचे मत सेवा भारती कोकण प्रांत व उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या प्रसंगी श्री. दत्ताजी घाडगे, श्री. अरुण गव्हाणकर, श्री. आनंद राऊळ, अंतरा शिंदे हे मान्यवर देखील उपस्थित होते. AG/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *