किल्ले रायगडवरील वाघ दरवाजाच्या जतन, संवर्धन कामाला प्रारंभ.
महाड, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील
किल्ले रायगडवरील वाघ दरवाजाच्या जतन आणि संवर्धन कामास रायगड विकास प्राधिकरणाने प्रारंभ केला आहे. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडवर जावून पाहणी केली आणि या कामाबाबत महत्वाच्या सूचनाही केल्या.
किल्ले रायगडवरील वाघ दरवाजा हा लष्करी वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमूना म्हणून ओळखला जातो.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर मुघल सैन्याने किल्ले रायगडला वेढा दिला. स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज, ताराबाई राणीसाहेब आणि त्यांचे सहकारी या वेढ्यामुळे गडावरच अडकून पडले होते. याच वाघ दरवाजामार्गे ते आपल्या निवडक सहकार्यांसह गडावरुन निसटले होते. त्यामुळे शिवकालीन इतिहासात या वाघ दरवाजाला अनन्यसाधारण असे महत्व आहे.
वाघ दरवाजाचे हे महत्व विचारात घेवून त्याचे जतन आणि संवर्धन करण्यापूर्वी रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या दरवाजाचे आणि भोवतालच्या तटबंदीचे शास्त्रोक्त दस्ताऐवजीकरण करण्यात आले. त्यानंतर तीन टप्प्यांत वाघ दरवाजाचे जतन आणि संवर्धन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात दरवाजा आणि तटबंदीवर उगवलेल्या झाडा झुडपांवर रासायनिक फवारणी करून ती मुळासकट नष्ट करण्यात येणार आहेत.
दुसर्या टप्प्यात वाघ दरवाजाच्या छताला लागलेली गळती पारंपारिक बांधकाम साहित्याचा वापर करुन बंद करण्यात येणार आहे. तिसर्या टप्प्यात वाघ दरवाजाच्या उजव्या आणि डाव्या बाजूच्या भिंतींचे संवर्धन करण्यात येईल. पारंपरिक पद्धतीचा वापर करून या भिंती जलरोधक करण्यात येतील. त्याच प्रमाणे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी तटबंदीतील मूळ जल नाळ्या पुन्हा कार्यरत करण्यात येणार आहेत.
रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी किल्ले सुरु असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. “मराठा साम्राज्याच्या इतिहासात वाघ दरवाजाने अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे. या दरवाजाच्या जतन आणि संवर्धनाचे काम प्रगतीपथावर आहे याचा आनंद आणि समाधान आहे.” असे यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
” वाघ दरवाजा हा अत्यंत दुर्गम आणि अवघड अशा वाटेवर आहे. या ठिकाणी जतन आणि संवर्धनाचे काम सुरु असल्याने गडावर येणार्या शिवभक्तांनी या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन करीत या भागात शिव भक्तांसाठी आवश्यक त्या सुरक्षतेच्या उपाय योजना लवकरच करण्यात येणार आहेत.” असा विश्वासही रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केला.
ML/ML/PGB
12 Dec 2024