मुंबईत थरारनाट्य, अल्पवयीन मुले ओलीस, आरोपी चकमकीत ठार
पवई परिसरातील महावीर क्लासिक इमारतीत असलेल्या ‘आरए स्टुडिओ’मध्ये गुरुवारी (दि. ३०) दुपारी घडलेल्या थरारक प्रकाराने संपूर्ण मुंबई हादरली. रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने अभिनयाच्या ऑडिशनच्या बहाण्याने बोलावलेल्या १७ अल्पवयीन मुलांना आणि इतर दोघांना ओलीस ठेवलं होतं. तब्बल एक तास चाललेल्या थरार नाट्यानंतर १९ जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली. रोहित आर्यचा पोलिसांनी एन्काउंटर केला. छातीत डाव्या बाजुला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. सध्या त्याचा मृतदेह सेव्हन हिल्स रुग्णालयात ठेवण्यात आला.
PTI ने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे १.४५ वाजता पवई पोलिसांना फोनवर माहिती मिळाली की, एका स्टुडिओमध्ये काही मुलांना ओलीस ठेवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांसह क्विक रिस्पॉन्स टीम (QRT), बॉम्ब शोधक आणि निकामी पथक, तसेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
पोलिस उपायुक्त (DCP) दत्ता नलावडे यांनी सांगितले, की आरोपी रोहित आर्यने सुमारे १५ वर्षांच्या मुला-मुलींना ‘वेब सिरीजच्या ऑडिशन’साठी बोलावलं होतं. मात्र, नंतर त्याने त्यांना आत बंद करून ठेवले आणि सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्या व्हिडिओमध्ये त्याने काही लोकांशी थेट संवाद साधायचा असल्याचं सांगितलं आणि जर त्याला तसे करू दिलं नाही तर तो स्टुडिओला आग लावेल, अशी धमकी दिली.