खेलो इंडिया पॅरा स्पर्धा, महाराष्ट्र पदक तक्त्यात पाचव्या स्थानावर

नवी दिल्ली दि २७– महाराष्ट्राने नवी दिल्लीत संपलेल्या खेलो इंडिया स्पर्धेच्या टेबलटेनिसमध्ये पदकाचा षटकार झळकावला. 18 सुवर्णांसह 43 पदकांची लयलूट करीत महाराष्ट्राने पदक तक्त्यात पाचवे स्थान पटकावले. कोल्हापूरच्या दत्तप्रसाद चौगुले आणि विश्व तांबे यांनी सुवर्णपदकाला गवसणी देत राज्यासाठी स्पर्धेत सुवर्णसांगता केली.
दिल्लीतील पॅरा खेलो इंडियाच्या दुसर्या पर्वात महाराष्ट्राने गत वर्षापेक्षा सरस कामगिरी केली. यंदा 18 सुवर्ण, 13 रौप्य आणि 12 कांस्य अशी एकूण 43 पदके महाराष्ट्राच्या नावापुढे झळकली. गतस्पर्धेत 12 सुवर्णांसह 35 पदके महाराष्ट्राने जिंकली होती. यंदा अॅथलेटिक्समध्ये सर्वाधिक 23, बॅडमिंटनमध्ये 4, नेमबाजीत 3, अर्चरीत 2, पॉवरलिफ्टिंगमध्ये 5, टेबलटेनिसमध्ये 6 अशी एकूण 43 पदकांचा लयलूट केली आहे. हरियाणाने 104 पदके जिंकून सर्वसाधारण विजेतेपदाचा मान संपादन केला.
इंदिरा गांधी क्रीडा संकुलात संपलेल्या टेबलटेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या पॅरा क्रीडापटूंनी 3 सुवर्ण, 3 कांस्य पदकांची कमाई करीत दिवस गाजविला. मुंबईच्या रिशित नथवानी, कोल्हापूरचे दत्तप्रसाद चौगुले आणि विश्व तांबेने सुवर्णपदकाचा करिश्मा घडविला. विवेक मोरे, वैष्णवी सुतार , पृथ्वी बर्वे यांनी कांस्य पदकांची कमाई केली. दत्तप्रसाद, विश्वने सलग दुसर्यांदा सोनेरी यशाचा पल्ला पार केला. टेबल टेनिसमध्ये सर्वसाधारण विजेतेपदाचा मानही महाराष्ट्राने पटकविला.