खातेवाटपावरून अद्याप घोडे अडलेलेच , विस्तार केव्हा याचीच चर्चा
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी राज्याचे मंत्रिमंडळ अस्तित्वात आले असतानाच आता तिन्ही पक्षांच्या खात वाट्याला कोणती कोणती खाती येतात याचे वाटप करण्यावरूनच सध्या सरकारचे घोडे अडलेले दिसून येत आहे. त्यासोबतच मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होईल या संदर्भात चर्चा सुरू असून नागपूर अधिवेशनापूर्वी तो होणे अपेक्षित आहे .
भाजपा , शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी नेमकी कोणती कोणती खाती घ्यावीत यावरून अद्याप यशस्वी चर्चा झाल्याचे दिसून येत नाही. शिवसेनेला गृहमंत्री पद हवे आहे , भाजपा ते द्यायला तयार नाही, राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खाते हवे आहे, त्या संदर्भात देखील अद्याप स्पष्टता नाही , यासोबतच नगर विकास आणि महसूल या खात्याच्या संदर्भात देखील चर्चा सुरू असल्याचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिवसभर विविध वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. सर्व पक्षांना समान न्याय मिळाला असे दिसून आले पाहिजे असे त्यांनी या मुलाखतींमध्ये स्पष्ट केले आहे.
काल मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर येत्या 11 किंवा 12 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणे अपेक्षित आहे. तो कुठल्याही परिस्थितीमध्ये नागपूरच्या अधिवेशनापूर्वी म्हणजेच येत्या 16 तारखेपूर्वी होईल असे खुद्द मुख्यमंत्री म्हणाले आहेत , मात्र नेमकी त्याची तारीख किती हे अद्याप जाहीर झालेले नाही. तिन्ही पक्षांमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे त्यामुळे नेमके कोणाला मंत्रीपद द्यावे त्यांच्यासाठी कोणते निकष लावावे याचीच आखणी सध्या तिन्ही पक्षांमध्ये सुरू आहे.
जुन्या आणि जेष्ठ सहकार्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन नये असा एक मतप्रवाह असून नव्या रक्ताला वाव मिळावा आणि त्यातूनच पुढे पक्षाची बांधणी भविष्यात कशी होईल याकडे पहावी अशा दृष्टीने सर्व प्रयत्न सुरू आहेत . त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांपैकी सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांचा नंबर लागतो का हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. त्यासोबतच शिवसेनेमध्ये देखील अब्दुल सत्तार, संजय राठोड, दीपक केसरकर, तानाजी सावंत यांच्याबाबत खुद्द भाजपानेच आक्षेप घेतलेले आहेत, त्यामुळे त्यांची वर्णी देखील मंत्रिमंडळात लागते की नाही हे पाहणे देखील औत्सुक्याचे असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र जुने आणि नवे असा समन्वय साधलेला पाहायला मिळेल.
ML/ML/PGB 6 Dec 2024