निवडणुकीच्या रिंगणात मराठ्यांची खरी ताकद दाखवून देऊ
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :(एमएमसी न्यूज नेटवर्क) :आज पर्यत आश्वासनापलिकडे मराठा समाजाच्या पदरात काहीच पडलेलं नाही.महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात मराठा समाजाचे योगदान फार मोठं आहे .आमच्या धगधगत्या प्रश्नांची तड लावण्या ऐवजी राज्यकर्त्यांनी आमची हेटाळणी करीत आमच्या तोंडाला पाने पुसली आहेत. परंतु यापुढे ही लढाई सत्तेत येऊन करू असे सांगत मराठा समाजाची फसगत करू पाहणाऱ्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवू.असा थेट इशारा मराठा ठोक क्रांतीचे प्रणेते आबासाहेब पाटील यांनी मुंबईत दिला
आज मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या बैठकीत मराठा ठोक मोर्चाचे प्रणेते आबासाहेब पाटील यांनी राष्ट्रीय मराठा पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव पाटील यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी उपरोक्त भावना व्यक्त केल्या.
यावेळी राष्ट्रीय मराठा पार्टी चे उपाध्यक्ष प्रेमानंद वाघमारे, उमेश नांगरे, ऍड एच डी पाटील,अक्षय देशमुख, भाग्यश्री शिर्के,अंकुश गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
पाटील बोलताना पुढे म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणावर केवळ चर्चा आणि जोर नसलेल्या बैठका घेतल्या गेल्यात .कोणीही ठोस पावले उचललेली नाहीत.ही मोठी दुर्दैवाची बाब आहे.मराठा समाजाच्या हितासाठी आपण हा प्रवेश करीत असून पक्षाच्या भूमिकेशी कायम ठाम राहू असे सांगितले .
राष्ट्रीय मराठा पाठीच्या वतीने पाटीचे अध्यक्ष अंकुशराव पाटील म्हणाले की, ही निवडणूक लढवण्यासाठी योग्य उमेदवारांची निवड करणार असून राज्यातभरात शंभर ते सव्वाशे उमेदवार समाजाच्या हिताच्या मुद्द्यांवर विशेष भर देणार आहे. शेतकरी संकट, शिक्षणात समान संधी, बेरोजगारी आणि सामाजिक न्याय हे त्यांच्या जाहीरनाम्याचे प्रमुख मुद्दे असतील,
“मराठा समाजाच्या विकासासाठी आणि त्याच्या हक्कांसाठी आम्ही कुठलाही त्याग करण्यास तयार आहोत, असे पाटील यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठे परिवर्तन होण्याची शक्यता आहे, आणि मराठा समाजाने या निवडणुकीत ठाम आणि एकत्रितपणे भूमिका बजावली तर राज्याच्या राजकीय व्यवस्थेत मोठा फरक पडेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
Sw/ML/PGB 23 Oct 2024