अशोक खरात या भोंदू बाबाची कोट्यवधींची संपत्ती उघड…..
नाशिक दि २० : नाशिकमध्ये स्वतःला अंकशास्त्रज्ञ म्हणून सादर करणाऱ्या कथित भोंदू बाबाच्या संपत्तीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणून संबोधणाऱ्या अशोक खरात याने अवघ्या 15 वर्षांत सुमारे 200 कोटीहून अधिक रुपयांची संपत्ती उभी केल्याचा अंदाज तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकशास्त्र आणि भविष्यकथनाच्या नावाखाली राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी तसेच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क वाढवत मोठ्या प्रमाणात आर्थिक जाळे उभे करण्यात आले. याच माध्यमातून कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पाथर्डी परिसरात सुमारे 30 एकर जमीन असून तिची किंमत अंदाजे 150 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. तसेच सिन्नर तालुक्यातील मीरगाव आणि कहांडळवाडी येथे मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करण्यात आली आहे.
याशिवाय पत्नी आणि मुलींच्या नावे कोट्यवधींची मालमत्ता, मीरगाव येथे भव्य फार्महाऊस, ओझर विमानतळ परिसरात जमीन, कर्मयोगीनगरमध्ये आलिशान बंगला आणि कॅनडा कॉर्नर येथे कार्यालय असल्याची माहिती समोर आली आहे. शिर्डी परिसरातही मोक्याच्या ठिकाणी शेतजमीन असल्याचे तपासात उघड झाले आहे. दरम्यान, संबंधित मंदिर ट्रस्टच्या माध्यमातूनही दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आणखी मालमत्ता आणि आर्थिक व्यवहार समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ
उडाली आहे.ML/ML/MS