कारमधून ६० कोटींचे ॲम्फेटामाइन जप्त; ३९ किलोचा साठा
जळगाव दि २५– धुळे सोलापूर महामार्गावरील कन्नड घाटात चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी एका कारमधून ‘ॲम्फेटामाइन’ या ड्रग्जचा तब्बल ३९ किलो साठा पोलिसांनी हस्तगत केला. त्याची किमत ६० कोटी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही कारवाई झाली. या ड्रग्जची दिल्लीहून इंदूर, धुळे, संभाजीनगरमार्गे बंगळुरुकडे तस्करी सुरू होती. या तस्करीमागे आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
धुळ्याकडून येणारी डीएल. ९सी-बीबी. ७७७१ या क्रमांकाची ब्रेझा कार कन्नड घाटातून पुढे छत्रपती संभाजीनगरकडे निघाली होती. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत कार चालकाचे नाव सय्यद (रा. दिल्ली, वय सुमारे ४२ वर्षे) असून तो दिल्लीतून बंगळुरूकडे जात होता. तो इंदूरहून धुळे मार्गे चाळीसगावला आला. पुढे संभाजीनगरकडे जाताना चाळीसगावात पोलिसांना सापडला.
अम्फेटामाइनचा वापर एमडी ड्रग्जमध्ये केला जात असून त्याचे बाजार मूल्य प्रती किलो एक ते दीड कोटी रुपये आहे. चालकाकडे याप्रकरणाची चौकशी केली जात असून त्याच्या माध्यमातून मालकाचे नाव पुढे येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट सहभागी असल्याचा संशय आहे. या कारवाईबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना कळवले आहे. नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशीची मागणी केली आहे. ML/ML/MS