खान्देशात कानबाईचा गजर, भक्ती आणि उत्साह…

 खान्देशात कानबाईचा गजर, भक्ती आणि उत्साह…

धुळे दि ४ — खानदेशातील कानबाई लोकउत्सव परंपरा सुप्रसिद्ध आहे. धुळे जिल्ह्यात जुने धुळे, पेठ भाग, शिरपूर, दोंडाईचा, थाळनेर येथील कानबाई प्रसिद्ध आहेत. याशिवाय खानदेशात जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा नाशिकचा काही भाग तसेच महाराष्ट्राला लागून असलेला गुजरात तसेच मध्यप्रदेशात देखील हा उत्सव साजरा केला जातो.

श्रावणातल्या नागपंचमी
नंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. खान्देश – कान्हादेश. खान्देशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणुन त्यांनी देवीचा उत्सव सुरु करण्यासाठी ‘कानबाई’ हे नाव घेतलं असावं. हा उत्सव प्रामुख्याने बहुजन समाजात सोनार, शिंपी, चौधरी, माळी प्रामुख्याने साजरा होतो.

या उत्सवाच्या आधी दिवाळ सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगोटी होते. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुवुन घेतात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य म्हणजे गहु,चण्याची दाळ घेतले जाते.
चक्कीवालीला आधी सांगुन चक्कीवरुन दळुन आणले जाते. विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या डाळीचाच स्वैपाकात जास्त वापर असतो. पुरण पोळी, खीर कटाची आमटी चण्याची दाळ घालुन, गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. साड्यांचे पडदे लावुन सजावट केली जाते.

कानबाईचे नारळ मुख्यतः पुर्वापार चालत आलेले असते किंवा परनुन आणलेले असते. ‘कानबाई परनुन आणणे’- पुर्वीच्या काळी एखाद्या खेड्यात ठरवुन गावचे पाटील लोक गावोगावी आमंत्रण पाठवायचे. ज्या घरातल्या बाईला काही कापलेलं, भाजलेलं नाही. अंगावर एकही डाग नाही अशा सवाष्णी निवडल्या जायच्या. सासरी असल्यातरी सासरकडचे लोक घेउन यायचे. तेव्हा गावात उत्सव व्हायचा. त्या स्रीयांना नाना वस्त्र अलंकारांनी सजवुन त्यांची पुजा करायचे. गावची गावं जेवायला असायची. टनाने पुरणपोळ्या रांधल्या जायच्या. अक्षरशः बैलगाड्यांवर स्वच्छ धुतलेली धोतरं अंथरुन शिजवलेला भात लादला जायचा.

हा सगळा स्वैपाक नदीवरुन पाणी आणण्यापासून पुरुषमंडळी करायची. तिथे त्या सवाष्णींनी स्पर्श केलेला नारळ घेउन तोच वर्षानुवर्षे पुजेत वापरला जायचा. असे हे परनुन आणलेले नारळ त्या दिवशी धुवुन घेतात त्यालाच नथ, डोळे, बसवुन इतरही पारंपारीक दागिने घालतात. आणि केळीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेऊन तिची स्थापना होते. कलशावरुनच गळ्यातले हार, मणी मंगळसुत्र इत्यादी चढवले जाते. वेणी लावुन ओढणी लावली जाते. मग आरती, नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला पुरणपोळ्या, पुरणाचेच दिवे, देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट लाटणे, तवा हे सगळं कणकेचच केलं जातं.

हे सर्व ताटात ठेउन देवीला ओवाळतात. इतर सणासारखाच इथे ही ज्येष्ठांना मान असतो. रात्री जागरण केले जाते. फुगड्या, गाणी म्हटली जातात. काही जणांकडे फक्त रोट असतात. मग ते रोट परातीत घेउन कानबाईच्या दर्शनाला येतात. या दिवशी कुणी कानबाईला काही नवस केला असेल तर तो फेडण्यासाठीही गर्दी होते. मुख्यतः नारळाच्या तोरणाचा नवस असतो. आपल्या घरी दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताला लाह्या फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो. काहींकडे हातापायाची कानबाई असते तर काहींकडे कानबाई- रानबाई अशा दोघी बहिणी दोन वेगवेगळ्या चौरंगावर बसवतात.

दुसऱ्या दिवशी कानबाईच्या विसर्जनाची तयारी होते. कानबाईची आरती केली जाते. गल्लीतल्या सगळ्या कानबाया एकाच वेळेस निघतात. ढोल ताशांच्या गजरात कानबाईचा चौरंग डोक्यावर ठेउन बायका नदीवर निघतात. कानबाईपुढे फुगड्या खेळतात. वाजत गाजत जातांना समोरुन दुसरी कानबाई आली तर दोन्ही कानबायांची चौरंग जोडुन भेट घडवली जाते. नदीवर पुन्हा एकदा आरती होउन कानबाईच्या नारळाव्यतिरिक्त सगळ्याचे विसर्जन होते. नदीतलीच वाळू घेउन त्यावर कलशने आपापले कानबाईचे नारळ तसेच डोक्यावर घेउन पुन्हा वाद्यांच्या गजरात घरी परततात. कानबाईमुळे घरातली, गावातली इडा पिडा टळते असा लोकांचा विश्वास आहे.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *