वर्ध्यात खादीच्या कापडापासून T-Shirt निर्मिती

वर्धा, दि. ७ : महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित वर्ध्यातील मगन संग्रहालय समितीने खादीच्या कापडापासून टी-शर्ट तयार करण्याचा देशातील पहिलाच यशस्वी प्रयोग केला आहे. पारंपरिक खादीला आधुनिकतेची जोड देत, या उपक्रमाने खादीला नव्या पिढीमध्ये लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला आहे. देशी कापूस, सेंद्रिय शेती, नैसर्गिक रंग आणि गांधीवादी विचारांचा संगम असलेली ही निर्मिती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ही निर्मिती केवळ एक वस्त्र नव्हे, तर गांधी विचारसरणी आणि आधुनिक फॅशन यांचा संगम आहे. खादीला नव्या रूपात सादर करून वर्ध्याने देशभरात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
मगन संग्रहालयाचे खादी विभाग प्रमुख मुकेश लुतडे यांनी सांगितले की, “खादी केवळ वस्त्र नाही, तर तो एक विचार आहे. महात्मा गांधींनी रुजवलेले मूल्य आम्ही आधुनिकतेच्या माध्यमातून पुढे नेत आहोत.” खादीच्या माध्यमातून ग्रामोद्योग, नैसर्गिक शेती, महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या अनेक उपक्रमांनाही बळकटी दिली जात आहे.
खादीपासून टी-शर्ट निर्मिती कशी झाली?
मगन संग्रहालय समितीने अनेक वर्षांच्या संशोधनातून देशी कापसाच्या धाग्याचे तंत्रज्ञान विकसित केले. या धाग्यांपासून तयार केलेल्या खादी कापडाला नैसर्गिक रंगांनी रंगवले गेले. हे रंग डाळिंब-बाभळीची साल, बिहाडा, झेंडू-पळसाची फुले, मंजिष्ठा, नीळ, काथ यांसारख्या वनस्पतींपासून तयार करण्यात आले. या नैसर्गिक रंगांनी रंगवलेले कापड पर्यावरणपूरक असून, त्वचेसाठीही सुरक्षित आहे.
आधुनिक डिझाइन आणि तरुणाईसाठी आकर्षण
या खादी टी-शर्टमध्ये आधुनिक डिझाइन, रंगसंगती आणि फिटिंग यांचा समावेश असून, ते तरुण पिढीला आकर्षित करत आहेत. आजवर केवळ राजकारणी किंवा गांधीवादी विचारसरणीशी संबंधित लोकांपुरते मर्यादित असलेले खादी वस्त्र आता फॅशनच्या मुख्य प्रवाहात येण्यास सज्ज झाले आहे. या टी-शर्टमुळे खादीला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे.
स्थानिक शेतकऱ्यांना फायदा
या उपक्रमामुळे स्थानिक शेतकऱ्यांना सेंद्रिय कापूस उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. मगन संग्रहालयाने समुद्रपूर तालुक्यात नैसर्गिक शेती विकास केंद्राची स्थापना केली असून, हजारो शेतकरी या चळवळीशी जोडले गेले आहेत. कापसाच्या उत्पादनापासून ते कापड निर्मितीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया स्थानिक पातळीवरच केली जात आहे, ज्यामुळे ग्रामीण रोजगारनिर्मितीलाही चालना मिळाली आहे.
SL/ML