खादी हे शाश्वत विकासाचे साधन

 खादी हे शाश्वत विकासाचे साधन

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खादी हे कापड नसून जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. खादी हे शाश्वत विकासाचे एक साधन आहे. खादीबद्दल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमांत देशातील जनतेने खादी वापरण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर राज्यातील लघुउद्योजकांना सक्षम करण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने गेली 64 वर्ष अविरतपणे काम केले आहे, असे मत राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी व्यक्त केले.

राज्य खादी , ग्रामोद्योग मंडळाच्या 64 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागात यशस्वी उद्योग करणाऱ्या उद्योजकांना ग्रामोद्योग भरारी पुरस्काराचे वितरण यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला, सह मुख्य कार्यकारी अधिकारी रेश्मा माळी, अर्थसल्लागार स्मिता खरात, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, खादी आयोगाचे संचालक योगेश भामरे, नित्यानंद पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी तसेच राज्यातील विविध भागातील यशस्वी उद्योजक उपस्थित होते.

सभापती साठे पुढे म्हणाले की, पुरस्काराने ग्रामीण उद्योजकांना प्रेरणा मिळते. ग्रामीण रोजगार निर्मिती व्हावी यासाठी मंडळ अनेक योजना राबवित आहे. मधाचे गाव ही नावीन्यपूर्ण योजना राज्यात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. मधमाशी पालन हा शेतीला पूरक असणारा हा व्यवसाय लोकाभिमुख होत आहे. मंडळ गेली 64 वर्ष ग्रामीण जनतेसोबत असून त्यांच्याकरिता रोजगार निर्माण करून लोकांना अर्थसहाय्यासोबत अनुदान देखील मंडळाकडून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला म्हणाल्या, रोजगार, पर्यावरण आणि लोकाभिमुख काम करण्यासाठी मंडळाचे योगदान मोठे आहे आज अखेर हजारो लोकांना मंडळाने हाताला काम देऊन स्वावलंबी केले आहे. ग्रामीण उद्योजक खऱ्या अर्थाने समाजहिताचे काम करीत आहेत. वर्धापनदिनाच्या औचित्य साधून पुरस्कार कार्यक्रम अनेकांना प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.

पुरस्कारामध्ये सिंधुदुर्ग येथील कौसर खान यांना प्रथम, पुणे येथील प्रमोद रोमन यांना द्वितीय तर गोंदिया येथील श्रीकांत येरणे यांना तृतीय पुरस्कार देण्यात आले. उत्तेजनार्थ पुरस्कार ठाणे येथील सुजाता पवार, नांदेडचे बालाजी काजलवाड अमरावतीच्या उज्वला गोपाळ चंदन यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रमात मंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ग्रामोद्योग अंकाचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन रश्मी म्हाम्बरे यांनी तर आभार रेश्मा माळी यांनी मानले.

ML/ML/PGB
14 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *