केजरीवाल यांनी तुरुंगातून दिल्या ६ गॅरंटी
नवी दिल्ली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुरुंगातून राज्याचा कारभार हाकणारे मुख्यमंत्री अशी नकारात्मक प्रतिमा झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मतदारांना तुरुंगातूनच ६ बाबींची हमी दिली आहे. दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील अटकेच्या कारवाईविरोधात INDIA आघाडीने एकजूट दाखवत आज दिल्लीत ‘लोकतंत्र बचाव महारॅली’चे आयोजन केले होते. या रॅलीत देशभरातील २८ पक्ष सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी सभेला संबोधित करत केजरीवाल यांनी तुरुंगातून दिलेल्या ६ गॅरंटी वाचून दाखविल्या. तसेच अरविंद केजरीवाल हे १४० कोटी भारतीयांच्या हृदयात असल्याचे सांगत भाजपाला इशारा दिला.
केजरीवालांनी तुरुंगातून दिलेल्या ६ गॅरंटी
- संपूर्ण देशात २४ तास वीज पुरवठा देण्यात येईल. देशभरात कोठेही वीज पुरवठा कपात केला जाणार नाही.
- देशातील सर्व गरीबांचे वीज बील माफ केले जाईल.
- देशातील प्रत्येक गावात चांगली शाळा उभारली जाईल. गरीब आणि श्रीमंत अशा सर्वांना एकसमान शिक्षण मिळेल.
- देशातील प्रत्येत गावात ‘मोहल्ला क्लिनिक’ तयार करण्यात येईल. तसेच सर्व जिल्ह्यात मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल उभारण्यात येईल.
- स्वामीनाथन आयोगाच्या एमएसपीनुसार शेतकऱ्यांच्या पिकाला दर दिले जातील.
- दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार.
महारॅली समोर बोलताना सुनीता केजरीवाल म्हणाल्या, “भाजपावाले म्हणत आहेत, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात असल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. मात्र, अरविंद केजरीवाल हे खरे देशभक्त आहेत. त्यामुळे भाजपावाले त्यांना जास्त दिवस तुरुंगात ठेवू शकणार नाहीत. कारण कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात फक्त अरविंद केजरीवाल आहेत. स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्या लोकांनी बलिदान दिले, त्याप्रमाणे अरविंद केजरीवाल देशासाठी काम करत आहेत”.
यावेळी अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून दिलेले पत्र सुनीता केजरीवाल यांनी वाचून दाखवले. “मी आज तुम्हाला मते मागत नाही, तर नवा भारत घडविण्यासाठी मदत मागत आहे. १४० कोटी भारतीयांना नवा भारत घडविण्यासाठी निमंत्रण देत आहे. आपला भारत देश गौरवशाली असून आपल्या देशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. असे असूनही भारत देशातील लोक गरीब का आहेत?, मी सध्या तुरुंगात आहे, या ठिकाणी विचार करायला खूप वेळ मिळतो. या वेळात मी फक्त भारत मातेबद्दल विचार करतो. आपल्या देशातील लोकांना दोनवेळचे जेवण मिळत नाही, चांगले उपचार मिळत नाही, चांगले शिक्षण मिळत नाही. त्यामुळे भारत माताही दु:खी होत असेल”, असे अरविंद केजरीवाल यांनी लिहिलेले पत्र सुनीता केजरीवाल यांनी वाचून दाखवले.
SL/ML/SL
31 March 2024