केंद्र सरकारच्या लाडक्या महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा

 केंद्र सरकारच्या लाडक्या महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा

मुंबई, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या लाडक्या महायुतीचे सरकार असताना महाराष्ट्राला पर्यायाने महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्र द्वेष्टे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. देशात सर्वाधिक कर महाराष्ट्रातून जात असताना महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून भरीव असे काहीच मिळाले नाही. काँग्रेसच्या न्याय पत्राची उचलेगिरी अर्थसंकल्प दिसून आली आहे. अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विशेष कोणतीही तरतूद केली नाही. महाराष्ट्रातील कापूस, संत्रा, धान, कांदा, सोयाबीन, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा केंद्र सरकारला विसर पडल्याचे आता लपून राहिले नाही. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्प शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यामुळे केंद्राचे गोडवे गाणाऱ्या महायुतीने महाराष्ट्रासाठी काय आणले याचा हिशेब जनतेला द्यावा. विकास कामाच्या नावाखाली दिल्लीच्या चकरा मारणाऱ्या एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय नेतृत्वाशी निधीबाबत चर्चा केल्या की तिथे जाऊन राजकीय फायद्याची गणितं मांडली असा प्रश्न या अर्थसंकल्पामुळे पडतो. त्यामुळे महायुती सरकार महाराष्ट्राचा स्वाभिमान कितीवेळा तुडविणार याचा जाब जनताच विचारेल.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने न्यायपत्रात बेरोजगार तरूणांसाठी पहली नोकरी पक्की ही योजना आणली होती. या योजनेनुसार इंटर्नशिप देण्याचं आश्वासन आम्ही दिले होते. आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी हीच घोषणा केली आहे. एकीकडे विरोधकांवर रेवडी संस्कृती म्हणून टीका करायची आणि दुसरीकडे मात्र त्यांच्या योजनांची उचलेगिरी या अर्थसंकल्पात केली आहे. केंद्र सरकारला मतांसाठी आणि टॅक्ससाठी महाराष्ट्राची आठवण होते. परंतू महाराष्ट्राला निधी देताना केंद्र सरकार हात आखडता घेते.

केंद्र सरकार अस्थिर आहे. बिहारच्या जेडीयू आणि आंध्रच्या टीडीपी पक्षाच्या टेकूवर केंद्र सरकार उभे असल्याने बिहार आणि आंध्र प्रदेशवर निधीची खैरात केली आहे. देशातील सर्व राज्यांना न्याय देण्याची वृत्ती या सरकारची नाही. राजकीय फायदा असणाऱ्या राज्यातच निधी देणारं हे सरकार आहे. त्यामुळे आज सादर झालेला अर्थसंकल्प भारतासाठी नाही ठराविक राज्यासाठी आहे अशी टीका देखील वडेट्टीवार यांनी केली आहे.

ML/ML/SL

23 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *