केदार शिंदेंनी केली ‘आईपण भारी देवा’ चित्रपटाची घोषणा

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर केदार शिंदे यांनी आज महिला दिनाच्या निमित्तानं नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत केदार शिंदे यांनी ‘आईपण भारी देवा’ या नव्या कोऱ्या चित्रपटाची घोषणा करत आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. आईपण भारी देवा’ या चित्रपटाबाबतची इतर माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. त्याचसोबत या चित्रपटामध्ये कोण-कोण कलकार दिसणार आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पण याची माहिती देखील अद्याप सांगण्यात आली नाही. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन निर्मित, ज्योती देशपांडे, बेला शिंदे आणि अजित भुरे यांच्या सह-निर्मीत ‘आईपण भारी देवा’ चित्रपटाचे लेखन वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांनी केले आहे.
केदार शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर ‘आईपण भारी देवा’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘प्रत्येक घरातल्या बाईपणाच्या भारी गोष्टीनंतर दिग्दर्शक केदार शिंदे आणि जिओ स्टुडिओज घेऊन येत आहेत. प्रत्येक घरातल्या आईपणाची भारी गोष्ट ‘आईपण भारी देवा’ ‘ त्यांच्या या पोस्टला पसंती देत चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सांगितले की, ‘बाईपण भारी देवा या चित्रपटाने खूप काही शिकवलं. खरतर प्रत्येक कलाकृती आम्हा कलाकारांसाठी एक कार्यशाळा असते. पण बाईपण भारी देवा चित्रपट करताना आणि नंतर प्रदर्शित झाल्यावर रसिकांच्या प्रतिसादाने भारावलेपण आलं होतं. ही कलाकृती मी माझ्या आई, बायको, मुलगी, मावशी, आजी… यांच्यासाठीच केली होती. ‘अगं बाई अरेच्चा’ ने स्त्रीच्या मनात काय चालतं? याचा शोध घेतला, बाईपण भारी देवाने स्त्री मनाला समजून घेण्याची संधी मिळाली. या यशाने जबाबदारी वाढली. मग डोक्यात एक आलं. आईपण किती महत्वाचा नाजूक विषय आहे? एक आईच असते जी पुरूषाला जन्म देते. तिच्या भावना या अथांग समुद्रासारख्या असतात. त्यातलं ओंजळभर पाणी या चित्रपटाच्या निमित्ताने रसिकांच्या चरणी वाहणार आहे. हा चित्रपट फक्त कुणा स्त्रीसाठी नाही. तर तो समस्त रसिकांसाठी असेल. कारण प्रत्येकाला आई असते.’
SL/KA/SL
8 March 2024