वैयक्तिक आकसापोटीच कावेसर तलाव उद्यानाच्या सुशोभिकरणाला विरोध

 वैयक्तिक आकसापोटीच कावेसर तलाव उद्यानाच्या सुशोभिकरणाला विरोध

ठाणे दि ७– कावेसर तलाव उद्यानाचे सुशोभिकरण ही हिरानंदानी इस्टेट आणि परिसरातील रहिवाशांची मागणी आहे. मात्र गेली 10 वर्ष विभागातील कोणतीच विकासकामे न केलेल्या एका राजकीय पुढाऱ्याने काही नागरिकांना हाताशी धरुन रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. याच विभागातील लोकप्रतिनिधिनी सुशोभिकरण कामाच्या भूमिपूजनाला उपस्थित राहत सुशोभिकरण कामाचे स्वागत केले आहे. उद्यानाचे सुशोभिकरण झाल्यास तलावाचे सौंदर्य खुलेल आणि सुरक्षितता अधिक वाढेल, असा विश्वास येथील रहिवाशांनी आज पत्रकार परिषद घेत व्यक्त केला.  
हिरानंदानी इस्टेट मध्ये हिरानंदानी सिनिअर सिटीझन फाऊंडेशन, राष्ट्रीय योग ध्यान केंद्र, क्लब आणि सामाजिक संस्था आहेत. त्यांनी ठाणे महापालिकेचे सार्वजनिक उद्यानाचे जे कावेसर तलावाच्या शेजारी आहे त्याचे सुशोभिकरण व्हावे, अशी मागणी लेखी पत्राद्वारे केली होती. त्या अनुषंगाने खासदार नरेश म्हस्के यांनी निधी उपलब्ध करुन दिला आहे व ठाणे महापालिकेच्या माध्यमातून उद्यानाचे सुशोभिकरण होणार आहे.
उद्यानात सद्यस्थितीत चालायला निट जागा नाही. पायवाट निसरडी असल्याने ज्येष्ठ नागरिकांचा चालताना तोल जातो. सापांचा येथे वावर आहे. त्यामुळे येथे चांगली पायवाट असणे आवश्यक आहे. हिरानंदानी इस्टेट मधील रहिवाशांच्या विनंती वरुनच ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण, प्रदुषण नियंत्रण विभागाने एकत्र बसून उद्यान प्रकल्प आराखडा बनवला. मात्र आपली पोळी भाजण्यासाठी सुशोभिकरणाला विरोध होत आहे. कावेसर लेक क्राँकिटायझेशन' असा ते अपप्रचार करत आहेत. वास्तविककावेसर गार्डन ब्युटिफिकेशन’ असे वास्तव आहे. जर नागरिकांच्या काही सूचना असतील तर त्याचे स्वागतच आहे असे
प्रवीण नागरे म्हणाले. 
गेली अनेक वर्ष तलावाची आम्हीच देखरेख करत आलो आहोत. विविध भारतीय जातीचे झाडे आम्ही येथे लावली आहेत. झाडांना बारकोड लावले आहेत. फुलपाखरु उद्यान आम्ही उभारले आहे. येथील तलावातून उन्हाळ्यात काही जण पाण्याचा उपसा करायचे. त्याला आम्ही प्रतिबंध घातला. त्यामुळेच हा पुढारी आता विकासाला विरोध करत आहे. गैरसमज पसरवून हा पुढारी रहिवाशांची माथी भडकवित असल्याचे प्रवीण नागरे यांनी सांगितले.
सुशोभिकरण करतांना कावेसर तलावात कोणतीही छेडछाड केली जाणार नाही. जैवविविधतेला कोणतीही बाधा न आणता सुशोभिकरण होणार आहे. जैवविविधता राखणे आमचे कर्तव्यच आहे. जागतिक पर्यावरण दिनी आम्ही तलावाच्या किनारी वृक्षारोपण करणार होतो त्यालाही या पुढाऱ्याने  विरोध केला. कोरोना काळात हिरानंदानी इस्टेट येथील गेट जवळ आम्ही व्हॅक्सीनेशन सेंटर उघडले मात्र त्याला विरोध करत ही वास्तू अन्नदान छत्राच्या नावाखाली बळकावण्याचा प्रयत्न या पुढाऱ्याने  केला. मोफत आरोग्य केंद्र सुरु करणार होतो त्यालाही विरोध त्याने केला.
हिरानंदानी इस्टेट मधील रहिवाशांनी एकत्र येऊन हॅप्पी स्ट्रीट ही संकल्पना आम्ही येथे चालवतो मात्र त्यालाही विराध केला जात आहे. याच पुढाऱ्याने ब्रह्मांड तलावाचे सुशोभिकरण करतांना अर्धा तलाव काँक्रिटने गिळंकृत केला. तेव्हा या पुढाऱ्याविरोधात या पर्यावरणप्रेमींनी विरोध का केला नाही? असा सवाल प्रविण नागरे यांनी उपस्थित केला आहे.
एका पुढाऱ्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने प्रकल्पाला विरोध सुरु आहे, असे हिरानंदानी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष धर्मप्रकाश त्रिपाठी म्हणाले. तर हिरानंदानी इस्टेटमध्ये मी अनेक वर्ष राहतो. येथे तलाव आहे हेच आम्हाला माहिती नव्हते. प्रविण नागरे यांच्या टिमने येथे मेहनत घेऊन तलाव अणि उद्यान नावारुपास आणला. तेव्हा कोणी पुढे आले नव्हते अशी टिका रोडाज गृहसंकुलाचे अध्यक्ष बी.जे.राव यांनी केली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *