वैशाख पोर्णिमेला काटेपूर्णा अभयारण्यात पार पडली प्राणी प्रगणना
वाशिम, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशीम-अकोला जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या विस्तीर्ण काटेपूर्णा अभयारण्यात वैशाख पोर्णिमेच्या रात्री वन्यजीव व प्राणी गणना उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या वन्यप्रेमी, पर्यटकांनी ५ मे रोजी सायंकाळी ४ वाजेपासून अभयारण्यात निर्माण केलेल्या पाणवठ्यालगत असलेल्या मचाणावर रात्रभर जागे राहून विविध वन्यप्राण्यांच्या हालचालीच्या नोंदी घेत प्रगणना केली. हौशी पर्यटक व वन्यजीव प्रेमी वैशाख पोर्णिमेच्या या रात्रीची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतात. या रात्री चंद्र अधिक प्रकाशमान असल्यामुळे पाणवठ्यावर येणारा प्राणी मचाणावरुन सहज टिपता येतो तसेच वैशाख पोर्णिमेचा दिवसही तुलनेने जास्त उष्ण असल्यामुळे या रात्री वन्यजीव पाणी पिण्यासाठी रात्रीच्या वेळी पाणवठ्यावर येण्याची शक्यता जास्त असते त्यामुळेच वनविभागाच्यावतीने दरवर्षी प्राणी गणनेचे आयोजन केले जाते.सुमारे ६५०० हेक्टर क्षेत्रात वसलेल्या काटेपूर्णा अभयारण्याच्या उत्तरेस नैसर्गिक जलाशय असून पुर्वेकडील वनपरिक्षेत्रात नैसर्गिक जलस्त्रोत कमी असल्याने वनविभागाच्यावतीने ठिकठिकाणी कृत्रीम पाणवठे तयार करण्यात आलेले आहेत. याच पाणवठ्याच्या भोवती वन्यप्रेमींना प्राण्यांच्या नोंदी घेण्यासाठी ठराविक उंचीवर लाकडी मचाण तयार करण्यात आले आहेत. जैवविविधता आणि विविध प्रकारच्या वनसंपदेने नटलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात बिबट, अस्वल, चौसिंगा, काळवीट, नीलगाय, चितळ, रानडुक्कर, सायाळ, खोपळ, रानकुत्रे, सांबर तसेच हरियाल, नौरंग, सर्पगरुड, सातभाई,रातवा, खंड्या, चंडोल, घार, तुरेवाला सर्पगरुड, टकाचोर, तांबट आदी पक्ष्यांच्या प्रजाती पाहावयास मिळतात. दरम्यान काटेपूर्णा अभयारण्यात निर्सगानुभव घेण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या वन्यप्रेमींनी मचाणावर रात्रभर जागे राहून प्राणी व पक्ष्यांचे निरीक्षण करून नोंदी घेतल्या. काटेपूर्णा अभयारण्यातील प्राणी गणनेच्या अनुभवातून पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात निसर्गाला जवळून पाहता आले. विविध प्राण्यांचे व पक्ष्यांचे आवाजही ऐकावयास मिळाल्याने निसर्ग व्यासंगाचा परिपूर्ण आनंद लुटता आल्याने वन्यप्रेमींनी समाधान व्यक्त केले.
ML/KA/PGB 3 May 2023