कातळशिल्पांच्या संशोधनाकरिता वर्ल्ड हेरिटेज डेस्क स्थापन

 कातळशिल्पांच्या संशोधनाकरिता वर्ल्ड हेरिटेज डेस्क स्थापन

मुंबई, दि. १८ : कोकण किनारपट्टी व पठारावर आढळणाऱ्या हजाराहून अधिक प्राचीन कातळशिल्पांच्या (जिओग्लिफ्स) सखोल संशोधन, दस्तऐवजीकरण आणि संरक्षणासाठी ‘वर्ल्ड हेरिटेज डेस्क’ स्थापन करण्यात आला असून यासाठी शासनाकडून एकूण 14 कोटी 62 लाख 32 हजार 671 रुपये इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.

कोकणातील ही कातळशिल्पे आद्यऐतिहासिक मानवाची जीवनपद्धती, संस्कृती आणि त्या काळातील जैविक व सांस्कृतिक वारसा समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात. या वारशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी, यासाठी कोकणातील कातळशिल्पांचा नामांकन प्रस्ताव युनोस्कोकडे पाठवण्यासाठी केंद्र सरकारकडे विनंती प्रस्ताव ही पाठवण्यात आल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

कोकणातील कातळशिल्पांविषयी संशोधन, नवीन स्थळांचा शोध आणि दस्तऐवजीकरण करण्यासाठी वर्ल्ड हेरिटेज डेस्क 2026 ते 2029 या कालावधीत कार्यरत राहणार आहे. या अंतर्गत मुंबई आणि रत्नागिरी येथे दोन शाखा स्थापन केल्या जाणार असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

मुंबई शाखेमार्फत आंतरराष्ट्रीय संशोधन साहित्याचा अभ्यास, माहितीकोश (डेटाबेस) निर्मिती, युनेस्को मानकांनुसार निकष विकसित करणे तसेच संशोधन लेखन केले जाणार आहे. तर रत्नागिरी शाखेमार्फत क्षेत्रीय सर्वेक्षण, GPS आधारित नकाशांकन, ड्रोनद्वारे कातळशिल्पांचे दस्तऐवजीकरण, स्थानिक लोककथांचे संकलन आणि जनजागृती उपक्रम राबवले जाणार आहेत. तसेच या अभ्यासातून ही कातळशिल्प किती जूनी आहेत त्यांचे निर्माण कोणत्या काळात झाले, याचे संशोधन ही या निमित्ताने करण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी मनुष्यबळ, वैज्ञानिक चाचण्या, उपकरणे, वाहतूक आणि इतर बाबींवर खर्च केला जाणार असून. प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, मुंबई यांच्याकडे देण्यात आली असल्याचेही मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.
दरम्यान, या कातळशिल्पांना जागतिक स्तरावर प्रसिद्ध मिळावी व ही कला, त्यामध्ये दडलेला अती प्राचीन इतिहास हा जगासमोर यावा म्हणून एक विशेष माहीती पट हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा तयार करण्यात येणार असल्याचे ही मंत्री शेलार यांनी सांगितले.
यामुळे कोकणातील कातळकला जागतिक पातळीवर अधोरेखित होऊन कोकणातील भविष्यातील पर्यटनास मोठा हातभार लागणार आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *