सहा दिवस कसारा घाट राहणार बंद, हा आहे पर्यायी मार्ग

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई- नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटातील वाहतूक उद्यापासून सहा दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंतच या महामार्गावरील जुना कसारा घाटातील वाहतूक बंद राहील. जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी दोन टप्प्यात सहा दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.
२४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी 2025 या कालावधीत तर ३ मार्च ते ६ मार्च या दरम्यान मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्ती व पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक दिवसभरासाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार असून या दरम्यान नाशिक दिशेकडे जाणारी वाहतूक नाशिक-मुंबई मार्गिके वरील नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना काही दिवस या त्रासाला समोरे जावे लागणार आहे.
या दरम्यान नव्या मार्गावरून अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून ही वाहने मुंबई, पुणे एक्सप्रेसवेच्या मार्गे वळविण्यात येणार आहेत. वाहनचालक आणि प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
रस्ते दुरुस्तीमुळे कसारा घाटातील वाहतूक वळविण्यात आल्यामुळे मुंबई – नाशिक – शिर्डी असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या सहा दिवसांच्या कालावधीदरम्यान वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांच्या मदतीसाठी कसारा पोलीस, महामार्ग पोलीस घोटी केंद्र, महामार्ग पोलीस शहापूर केंद्र, आपत्ती व्यवस्थापन टीम नवीन कसारा घाटात कार्यरत राहणार असून नवीन कसारा घाटात ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी व मदत केंद्र देखील उभारली जाणार आहेत.
SL/ML/SL
23 Feb. 2025