अश्लील व्हिडिओ प्रकरणी कर्नाटकच्या डीजीपींचे निलंबन
बंगळुरु, दि. २१ : कर्नाटक पोलीस दलातील वरिष्ठ IPS अधिकारी आणि पोलीस महासंचालक (नागरी हक्क अंमलबजावणी) के. रामचंद्र राव यांना कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निलंबित करण्यात आले. डीजीपी कार्यालयातच वर्दीत असताना महिलांसोबत अश्लील वर्तन करत असल्याचा दावा करणारे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असून, सविस्तर तपासानंतर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले आहे.
“कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही. अधिकारी कितीही वरिष्ठ असला तरी त्याच्यावर कारवाई होईल,” असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बदामी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. या प्रकरणाची माहिती आपल्याला दिवसभरात मिळाली असून तात्काळ चौकशीचे आदेश दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
व्हायरल व्हिडिओंमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या व्हिडिओंचा स्रोत आणि सत्यता अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेली नाही. मात्र, राज्य सरकारने या सर्व बाबी चौकशीअंती तपासल्या जातील, असे सांगितले आहे. राज्य सरकारने गृहमंत्रालयाकडून या प्रकरणावर सविस्तर अहवाल मागवला आहे.
SL/ML/SL