कर्करोग विरोधात लढा देणाऱ्या रूग्णांचा सन्मान
मुंबई, दि.17(एम एमसी न्यूज नेटवर्क): लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि लोकमान्य टिळक सर्वसाधारण रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू व विविध आजारग्रस्त विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
कर्करोग, थॕलेसेमिया, बोन मॕरो ट्रान्सप्लांट यासारख्या आजारग्रस्त विद्यार्थी आणि गरीब रूग्णांची मुले अशा २५० विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वितरण शनिवारी करण्यात आले. समाजातील विविध दानशूर व्यक्तींनी या उपक्रमास हातभार लावल्याने शालेय वर्षाच्या सुरूवातीला विद्यार्थ्यांना एक चांगला मदतीचा हात या उपक्रमाच्या माध्यमातून मिळाला आहे. विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, लिखाणासाठी साहित्य, कंपास बॉक्स, पेन अशा विविध वस्तूंचा पुरवठा या उपक्रमातून करण्यात आला .
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाज उपयोगी उपक्रम राबविली जात आहेत.
आणखी एका कार्यक्रमात कर्करोगाचा सक्षमपणे आणि सातत्याने पाच वर्षाहून अधिक कालावधीसाठी मुकाबला करणार्या रूग्णांचा गौरव करण्यात आला. या रूग्णांनी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ केमोथेरपी घेत कर्करोगाविरूद्ध लढा कायम ठेवला आहे. या रूग्णांना उपचारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे ,अशी माहिती लोकमान्य टिळक सर्वसाधारण रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ मोहन जोशी यांनी दिली.
लोकमान्य सर्वसाधारण रुग्णालय तसेच रोटरी क्लब ऑफ सायनच्या माध्यमातून (२७ जून ) ला गरजू व मागास प्रवर्गातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना ५ लाख रूपयांची मदत करण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका शिक्षकाच्या मुलीकडून ही मदत देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ही मदत योग्य वेळेत मिळावी यासाठी समाजविकास अधिकारी श्रीमती स्मिता नगारे यांनी गेल्या दोन महिन्यांपासून अथकपणे मेहनत घेतली आहे.
ML/ML/PGB 17 Jun 2024