वाल्मीक कराडला १५ दिवसाची सीआयडी कोठडी

बीड, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यामध्ये गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्याकांड आणि आवादा एनर्जी पवन ऊर्जा प्रकल्पाच्या खंडणी प्रकरणाच्या गुन्ह्यातील आत्मसमर्पण केलेला वाल्मीक कराड याला केज न्यायालयाने १५ दिवसांची सी आय डी कोठडी सुनावली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग ता. केज येथे दि. ६ डिसेंबर रोजी आवादा एनर्जी या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या कार्यालयात खंडणी मागितल्या प्रकरणी झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेले सरपंच संतोष देशमुख यांचे सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदारांनी दिनांक ९ डिसेंबर रोजी त्यांचे अपहरण करून अत्यंत निर्घृणपणे खून केला.
त्यासोबतच २९ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांनी फोन वरून दोन कोटी रू. ची लाच मागितली म्हणून आवादा एनर्जी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी सुनील केदू शिंदे यांनी ११ डिसेंबर २०२४ रोजी दिलेल्या फिर्यादी वरून मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मीक कराड आणि राष्ट्रवादी.काँग्रेस अजित पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे , सुदर्शन घुले यांच्यासह तिघांच्या विरुद्ध गु र नं. ६३८/२०२४ भा. न्या. सं. ३०८(२), ३०८(३), ३०८(४), ३०८(५) ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान.दिनांक ९, डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या झाल्या नंतर या हत्याकांडाशी खंडणी प्रकरण सबंधित असून त्या दिवसा. पासून वाल्मीक कराड फरार होता. कराड याने ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुणे येथील सीआयडी कार्यालयात हजर होत आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्याला सी आय डी च्या पथकाने रात्री १०:०० वाजता केज पोलीस ठाण्यात आणून त्याला रात्री १०:४५ च्या सुमारास केज येथील कनिष्ठ न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पावस्कर यांनी त्याला १४ जानेवारी २०२५ पर्यंत १५ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.
ML/ML/PGB
1 Jan 2025