बहुचर्चित वाल्मिक कराड अखेर सीआयडीपुढे शरण

 बहुचर्चित वाल्मिक कराड अखेर सीआयडीपुढे शरण

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बीड जिल्ह्याच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड अखेर मंगळवारी पुण्यात सीआयडीसमोर शरण आला. त्यामुळे कराडच्या चौकशीतून संपूर्ण राज्यात खळबळ माजलेल्या या प्रकरणातील सत्य उलगडणार का याबाबत उत्सुकता लागली आहे .

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने आतापर्यंत ४ आरोपींना अटक केली आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याने त्याला अटक करण्याच्या मागणीवरून जोरदार राजकीय वादळ उठले होते. कराडच्या अटकेसाठी दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चातील नागरिकांच्या अत्यंत संतप्त प्रतिक्रिया होत्या. त्यामुळे वाल्मिक कराडला अटक करण्याबाबत सरकारवर दबाव वाढला होता.

या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर सीआयडीने कराडच्या मुसक्या आवळण्यासाठी
नऊ पथके तयार केली. या पथकांमध्ये सुमारे दीडशेहून अधिक अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. या पथकाने संतोष देशमुख यांच्या हत्येविषयी शंभरापेक्षा जास्त लोकांची चौकशी केली आहे. वाल्मिक कराडची बँक खाती गोठवून त्याची आर्थिक नाकेबंदी केली होती. याशिवाय राजकीय दबाव वाढल्यामुळे वाल्मीक कराड पुण्यात सीआयडी कर्यालयात शरण येईल,असा कयास बांधला जात होता. कराड याच्यापुढे कुठलाही पर्याय शिल्लक नसल्याने अखेर तो शरण आला.

वाल्मीक कराड शरण येण्याच्या शक्यतेमुळे पुण्यातील सीआयडी कार्यालयाबाहेर धनंजय मुंडे आणि कराड समर्थकांनी गर्दी केली होती. कराडांविरोधात खोटे आणि चुकीचे गुन्हे दाखल केल्याचा त्यांचा दावा होता. त्यामुळे सीआयडी कार्यालय परिसरात चोख बंदोबस्त करण्यात आला होता. समर्थकांनी आधी वातावरण निर्मिती केल्यानंतर वाल्मीक कराड अगदी हात जोडून सीआयडीच्या पायऱ्या चढत शरण आला. तो येताच माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याला गराडा घातला.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकीय द्वेषापोटी माझे नाव जोडले जात असल्याचे वाल्मीक कराडने शरण येण्यापूर्वी जारी केलेल्या व्हिडीओत सांगितले. पोलीस तपासात जे निष्कर्ष समोर येतील आणि मी दोषी आढळलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार आहे असेही त्याने व्हिडीओत  म्हटले आहे.

ML/ML/PGB
31 Dec 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *