अवकाळी पावसाने कापसाचे नुकसान, शेतकरी पुन्हा संकटात
चंद्रपूर दि ५ :- चंद्रपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मोंथा चक्रीवादळासह आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कापसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तोडणीला आलेला कापूस पावसामुळे भिजून खाली पडत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात धान, कापूस, सोयाबीन ,तूर खरीप पिके घेतली जातात. आधीच सोयाबीनच्या पिकाचे नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांना आता कापसाच्याही नुकसानीचा फटका बसला आहे. भिजलेल्या कापसाला बाजारात फारसा दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाने याची गंभीर दखल घेत पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि कर्जमाफीची तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.ML/ML/MS