परंपरागत पिकांना बगल देत फुलवली कांदा-लसूण शेती.
वाशीम दि ४ ( राम धनगर ) : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील तरुण शेतकरी गणेश विठ्ठल नवघरे यांनी वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी शेतीत नवा प्रयोग करत यावर्षी रब्बी हंगामात मोठा बदल घडवून आणला आहे. आतापर्यंत सातत्याने घेत असलेली हरभरा व गहू ही पारंपरिक पिके बाजूला ठेवत त्यांनी प्रथमच दोन एकर क्षेत्रावर कांदा बिजवाई तसेच अर्धा एकर क्षेत्रावर लसूण लागवड केली. या धाडसी प्रयोगाला यश मिळताना दिसत असून सध्या त्यांच्या शेतात कांद्याला मोठ्या प्रमाणावर गोंड्याचे (कांद्याच्या फुलांचे) प्रमाण दिसून येत आहे. पिकांची वाढ जोमाने होत असून उत्पादन भरघोस येण्याची शक्यता तज्ज्ञ व शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

यावर्षी रब्बी हंगामात हरभरा, गहू या पिकांना बगल देत कांदा , लसूण या नगदी पिकांकडे वळण्याचा निर्णय फायदेशीर ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. बाजारातील चांगला दर, पिकांची सद्यस्थिती आणि शेतातील सकारात्मक वातावरण पाहता या पिकांतून समाधानकारक आर्थिक उत्पन्न मिळेल, असा विश्वास शेतकरी गणेश नवघरे यांनी व्यक्त केला आहे.ML/ML/MS