कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; कांदे फेकून आंदोलन…

नाशिक दि २९– कांदा उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. कांद्याच्या मुद्द्यावर चर्चेसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला अधिकाऱ्यांनी वेळ न दिल्याने शेतकरी संतप्त झाले होते. या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर कांदा फेकून आपला रोष व्यक्त केला. तसेच थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर कांदे फोडून आपला निषेध व्यक्त केला.
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे काही पदाधिकारी आज कांद्याच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आले होते. मात्र या ठिकाणी या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी अधिकारी वेळ देत नसल्याने शेतकरी संतप्त झाले होते. दरम्यान या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनाच्या बाहेरच कांदे फोडून रोष व्यक्त करत घोषणाबाजी देखील केली. हातात कांदे घेऊन शेतकऱ्यांनी सरकारच्या कांदा विरोधी धोरणांचा निषेध केला.
आक्रमक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरच घोषणाबाजी करायला सुरुवात केल्याने पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली. यामुळे आंदोलक आणखी आक्रमक झाले. तर आंदोलकांनी थेट निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरच पुन्हा एकदा कांदे फोडले. तसेच आपल्या सोबत आणलेली शिदोरी सोडून निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडून कांदा भाकर आंदोलन सुरू केले.
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी न करण्याचे धोरण स्वीकारावे आणि ते पुढील २० वर्षांसाठी कायम ठेवावे.
कांद्याची किमान आधारभूत किंमत (MSP) उत्पादन खर्च व नफा यावर आधारित किमान ३,००० रुपये प्रति क्विंटल ठेवावी. राज्य शासनाने कांदा हमी दराने खरेदी करण्यास सुरुवात करावी आणि यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे.
कमी दरात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल किमान १,००० रुपये अनुदान द्यावे. राज्यात कांदा प्रक्रिया उद्योगांची स्थापना करावी.
वाहतूक आणि इंधन दरात सवलत देऊन कांद्याचा पुरवठा सुलभ करावा व निर्यातीवर १०% अनुदान मिळावे. बफर स्टॉकसाठी कांदा बाजार समित्यांमधूनच किमान ३,००० रुपये दराने खरेदी करावा अन्यथा नाफेड व एनसीसीएफ यांची खरेदी बंद करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. ML/ML/MS