घरांच्या प्रश्नावर १४ संतप्त कामगार संघटना पुन्हा आंदोलन छेडणार!

मुंबई, दि ८: गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर सरकारने दिलेल्या आश्वासनाची त्वरित पुर्तता करावी,अन्यथा गिरणी कामगार पुन्हा तिव्र आंदोलनासाठी रस्त्यावर उतरतील,असा एक मुखी निर्णय १४ कामगार संघटना एकत्र आलेल्या “गिरणी कामगार संयुक्त लढा समितीने’आज घेतला आहे.
९ जुलै रोजी कामगारांच्या रखडलेल्या गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे गिरणी कामगारांचे भव्य आंदोलन छेडण्यात आले होते.त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० जुलै रोजी विधान भवन येथे कामगारनेते आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून सकारात्मक निर्णय घेतले होते.त्या निर्णयांची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे.या पार्श्वभूमीवर परेल येथील राष्ट्रीय मिल मजूर संघ येथे, समितीचे निमंत्रण गोविंदराव मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.या बैठकीत कामगार नेत्यांनी घरांबाबत सरकारच्या वेळकाढू धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे.
गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत खालील प्रमाणे निर्णय घेतले होते,
१)दि.१५ मार्च २०२४ रोजीच्या अध्यादेशातील गिरणी कामगारांना घातक ठरलेले कलम १७ रद्द करावे आणि कामगारांचा घराचा अधिकार कायम ठेवावा.
२) मुंबईतील मोकळ्या जागे संदर्भात संबंधित अधिकाऱ्याद्वारे माहिती घेऊन गिरणी कामगारांना मुंबईतच घरे उपलब्ध करून देण्यात येतील.
३) मुंबईतील मिठागराची जागा घरांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल.
४)बी.डी.डी.चाळ आणि धारावी येथील गृहनिर्माण योजनेतील अधिकची घरे गिरणी कामगारांना उपलब्ध करून देण्यात येतील.
५) झोपडपट्टी पुनर्वसन किंवा अन्य ठिकाणच्या बांधकामात एक “एफएसआय” अधिकचा देऊन, गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यात येतील.
६)उर्वरित गिरणी कामगारांच्या घर बांधणीचा कालबद्ध कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल,
आदी कामागारांच्या मागण्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक पाठिंबा दिला होता.या प्रश्नावर अद्याप ‘जीआर’ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे कामगार संघटनांमध्ये आज नाराजीचा सूर काढण्यात आला.
बैठकीत निमंत्रक गोविंदराव मोहिते,निवृत्ती देसाई,बाळ खवणेकर,हेमंत गोसावी, विठ्ठल मोरे, बबन मोरे, रमाकांत बने, हरिनाथ तिवारी,आनंद मोरे, बजरंग चव्हाण आदी कामगार नेत्यांनी वरील प्रमाणे गिरणी कामगारांच्या व्यथा मांडल्या!KK/ML/MS