कामगार पेटी वाटपाच्या कार्यक्रमात लाडक्या बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भंडाऱ्यातील अग्रेसन भवन मंगल कार्यालयात महिला कामगारांसाठी पेटी वाटपाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी तिथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी महिलांवर लाठीचार्ज करून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. यात झालेल्या चेंगराचेंगरीत पाच ते सहा महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. मागील काही दिवसांपासून पेटी मिळावी, यासाठी भंडाऱ्याच्या ग्रामीण भागातील महिलांनी भंडाऱ्यात अर्ज भरला होता. दरम्यान, आज नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील अग्रेसन भवन येथे पेटी वाटपाचा कार्यक्रम असल्याने अगदी मध्यरात्रीपासूनच भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात महिला येथे उपस्थित झाल्या होत्या.
अचानक मोठी गर्दी या कार्यक्रमाला उसळल्याने ही गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली होती. अशातच, सायंकाळच्या सुमारास येथील कर्तव्यावरील पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी महिलांवर लाठीचार्ज केला. यामुळे काही महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर आता भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. एकीकडे राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविण्यात येत असताना भंडाऱ्यामध्ये लाडक्या बहिणींवरच पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याची घटना घडली.
PGB/ML/PGB
1 Oct 2024