रमाई ते दृष्टी : प्रा. आशालता कांबळे यांच्या तीन पुस्तकांचे २१ फेब्रुवारीला मुंबईत भव्य प्रकाशन
मुंबई, दि १६: ज्येष्ठ लेखिका, कवयित्री, समीक्षिका आणि फुले–आंबेडकरी चळवळीतील तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्या प्रा. आशालता कांबळे यांच्या तीन महत्त्वपूर्ण पुस्तकांचा प्रकाशन सोहळा शनिवार, दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता, दादर (पूर्व) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दि पिपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट यांच्या वतीने होणार आहे.
या सोहळ्यात ‘रमाई एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व’, ‘आईची पत्रे’ आणि ‘दृष्टी’ ही तीन पुस्तके मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित होणार आहेत. सामाजिक न्याय, स्त्री-स्वातंत्र्य, वैचारिक प्रबोधन आणि आंबेडकरी विचारसरणीच्या विविध पैलूंना स्पर्श करणारे हे लेखन अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींसाठी दिशादर्शक ठरणार आहे. विशेषतः ‘रमाई एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व’ या ग्रंथातून रमाबाई भीमराव आंबेडकर (रमाई) यांच्या कणखर, त्यागमय आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्त्वाचा स्वतंत्र व सखोल अभ्यास सादर करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर (राष्ट्रीय कार्याध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा) विराजमान राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे, समाजवादी नेते कपिल पाटील, ‘रमाई’ मासिकाच्या संपादक प्रा. डॉ. रेखा मेश्राम आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई धाकतोडे आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार व साहित्यिका विनिशा धामणकर-पवार करणार आहेत.KK/ML/MS