काळा घोडा कला महोत्सवात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बचत गटांची ‘दिवाळी’

 काळा घोडा कला महोत्सवात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बचत गटांची ‘दिवाळी’

मुंबई, दि १६
९ दिवसांत ८.५४ लाख रुपयांची विक्रमी उलाढाल*
मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेला काळा घोडा कला महोत्सव २०२६ मध्ये यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या पुढाकारातून सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.

गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना राबवित असते. महानगरपालिकेच्या नियोजन विभागाकडून यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. या अंतर्गत महिला बचत गटांना अर्थसहाय्य केले जाते. बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळावी, प्रसिद्धी मिळावी तसेच त्यातून बचत गट सदस्यांना आर्थिक उत्पन्न मिळावे, यासाठी महानगरपालिका विविध प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते.

मुंबईत दिनांक ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला लाखो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत महानगरपालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, घरगुती खाद्यपदार्थ व विविध उपयोगी साहित्याला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महिला बचत गटांच्या परिश्रमाला यश

या उपक्रमामुळे महिला बचत गटांना आर्थिक उत्पन्नाबरोबरच त्यांच्या उत्पादनांचे ब्रँडिंग, नव्या ग्राहकांशी थेट संवाद आणि बाजारपेठेचा अनुभव मिळाला. एकूण १८ बचत गटांनी सहभाग नोंदवून आर्थिक स्वावलंबनाचे ठोस उदाहरण निर्माण केले. यावर्षीच्या काळा घोडा महोत्सवाचे वेगळेपण म्हणजे प्रथमच तृतीयपंथी बचत गटाने या महोत्सवात सहभाग घेतला.

बृहन्मुंबई महानगरपालिका महिला बचत गटांना केवळ प्रशिक्षण देत नाही, तर त्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. काळा घोडा कला महोत्सवासारख्या जागतिक व्यासपीठावर महिला व तृतीयपंथी समुदायातील सदस्यांना मिळालेला ८ लाख ५४ हजार रुपयांचा स्वयंरोजगार हा त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणातील महत्त्वाचा टप्पा आहे, अशी माहिती संचालक (नियोजन) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर यांनी दिली.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *