काळा घोडा महोत्सवात बीएमसी बचत गटांच्या उत्पादनांना पर्यटकांची पसंती!
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबई महानगरातील फोर्ट परिसरात सध्या काळा घोडा कला महोत्सव सुरू आहे. या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी संपूर्ण मुंबईसह देशभरातील पर्यटक येत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या बचत गटांनी देखील या महोत्सवात दालन प्रदर्शित केले आहेत. महिलांनी कलाकुसरीने आणि मोठ्या कौशल्याने तयार केलेली विविध आभूषणे, संसारोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने पर्यटकांच्या पसंतीला उतरत आहेत. या निमित्ताने बचत गटांतील महिलांनाही उत्पन्न मिळत आहे.
गरजू महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने विविध योजना राबवित असते. महानगरपालिकेच्या नियोजन विभागामार्फत महिला बचत गटांना अर्थसहाय्य केले जाते. या महिलांच्या बचत गटांनी तयार केलेल्या उत्पदनांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळावी, प्रसिद्धी मिळावी तसेच त्यातून महिलांना आर्थिक उत्पन्न मिळावे, यासाठी देखील महानगरपालिका विविध प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते.
याचाच एक भाग म्हणून काला घोडा महोत्सवातही महानगरपालिकेने या बचत गटांसाठी दालने (स्टॉल्स) उपलब्ध करून दिले आहेत. या महोत्सवात १८ बचत गट सहभागी झाले आहेत. त्यामध्ये बी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर, जी दक्षिण, एच पूर्व, एल, एम पश्चिम, एन, एस, पी उत्तर, आर दक्षिण या प्रशासकीय विभागातील बचत गटांचा समावेश आहे.
महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या बचत गटांनी निरनिराळ्या क्षेत्रात भरारी घेतली आहे. कापड व्यवसाय, आभूषणे, कापडी पिशव्या, खाद्यपदार्थ, गोधडी, शिल्पकला, महिलांसाठीच्या-कार्यालयीन कामकाजाच्या पर्स, बॅग अशी निरनिराळी उत्पादने त्यांनी तयार केली आहेत. काळा घोडा महोत्सवात सहभागी झालेल्या १८ बचत गटांनी फॅन्सी चप्पल, बॅग, गोधडी, लाकूड फेब्रिक ज्वेलरी, सजावटीच्या वस्तू, मुखवास, साबण, तेल, बिस्कीट, आभूषण या प्रकारच्या वस्तू विक्री करणारे दालन उभारले आहेत.
ML/ML/PGB 29 Jan 2025