कडधान्यांपासून साकारले बाप्पा!

वाशीम दि ३०:– गणेशोत्सव म्हटलं की भव्य मूर्ती, आकर्षक सजावट आणि लाखो रुपयांच्या स्पर्धा डोळ्यांसमोर उभ्या राहतात. मात्र वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) येथील श्रीमंत बालहौसी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा साकारलेली गणेश मूर्ती वेगळेपणामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण हा बाप्पा कडधान्यांपासून बनवलेला आहे.
कारंजा लाडच्या भाजीबाजारात बसवलेली ही सात फूट उंचीची मूर्ती तब्बल ३० दिवस मेहनत घेऊन आणि १८ किलो कडधान्यांचा वापर करून साकारण्यात आली आहे. हरभरा, मसूर, तूर, मूग, उडीद अशा दहा प्रकारच्या कडधान्यांचा वापर करून बाप्पाच्या डोळ्यांपासून मुकुटापर्यंत सुंदर नक्षीकाम करण्यात आलं आहे.
मंडळाचे पदाधिकारी सुमीत येवतेकर यांनी सांगितले की, “मोठ्या मंडळांकडून लाखो रुपयांच्या पीओपी मूर्ती बसवल्या जातात. पण आम्ही काहीतरी वेगळं करावं आणि पर्यावरणपूरकतेला चालना द्यावी, या हेतूने कडधान्यांचा बाप्पा साकारला.” गेल्या काही वर्षांपासून या मंडळाने पीओपीला नकार देत पर्यावरणपूरक मूर्तींची परंपरा जपली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून मंडळाच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक होत आहे.ML/ML/MS