कबूतरखान्यावर बंदी,
न्यायालयाच्या निर्णयाचा आदर , जनभावनेचाही विचार करावा…

मुंबई दि ३ — मुंबईत कबूतरांना आहार देण्यावर निर्बंध लावण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेत राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून पक्षीप्रेमी, साधू-संत व नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेण्याची विनंती केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवत सुवर्ण मध्य काढण्याचे आवाहन त्यांनी पत्राद्वारे केले.
लोढा यांनी पत्रात नमूद केले आहे की, आहाराअभावी कबूतरांचा रस्त्यांवर मृत्यू होत असून त्यामुळे नवीन सार्वजनिक आरोग्यविषयक समस्या उद्भवत आहेत. याबाबत महापालिकेने व्यापक आणि संतुलित दृष्टिकोन ठेवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
या पत्राद्वारे त्यांनी पुढील सूचना मांडल्या आहेत:
कबूतरांना आहार देण्यासाठी पर्यायी उपाययोजना राबवाव्यात.
बीकेसी, रेसकोर्स, आरे कॉलनी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांसारख्या मोकळ्या जागांना सुरक्षित व नियंत्रित आहार क्षेत्र म्हणून निश्चित करण्याचा विचार करावा.
दीर्घकाळ चालत आलेल्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचा आदर राखून निर्णय घ्यावा.
जनभावनेची दखल घेत, सार्वजनिक आरोग्य आणि पशुप्रेम यामधील संतुलन साधणारा सुवर्णमध्य काढावा.
लोढा यांनी स्पष्ट केले आहे की, महानगरपालिका ही एक जबाबदार संस्था असून ती या विषयाकडे मानवी व संवेदनशील दृष्टिकोनातून पाहील, अशी अपेक्षा आहे.ML/ML/MS