कबुतरखान्यांबाबत जैन समाजाच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. गगराणी यांची घेतली भेट

 कबुतरखान्यांबाबत जैन समाजाच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. गगराणी यांची घेतली भेट

मुंबई, दि २९
मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला / नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेवून बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्या उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांचेकडे केली. दरम्यान, अशा पर्यायी जागांचा शोध घेवून त्याबाबतची माहिती माननीय न्यायालयाकडे सादर करण्यात येईल, असे श्री. गगराणी यांनी या शिष्टमंडळाला सांगितले.

मुंबई महानगरात ठिकठिकाणी असणारे कबुतरखाने माननीय न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. तसेच, कबुतरखान्यांच्या ठिकाणी नियंत्रित पद्धतीने व ठराविक वेळेतच कबुतरांना खाद्य पुरवावे (Control Feeding) किंवा कसे, तसेच यातील अन्य मुद्द्यांबाबत माननीय न्यायालयाच्या आदेशान्वये हरकती / सूचना मागविण्याची कार्यवाही देखील महानगरपालिका प्रशासनाने केली.

या सर्व पार्श्वभूमीवर श्री मुंबई जैन संघ संगठनचे श्री. नितीन व्होरा, श्री. मुकेश जैन, श्री. अतुल शहा, श्री. विजय जैन, अध्यात्म परिवाराचे श्री. हितेश मोटा आदींच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांची आज (दिनांक २८ ऑक्टोबर २०२५) सायंकाळी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात भेट घेतली. मुंबईतील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये अशा जागांचा शोध घ्यावा की जिथे कबुतरांना दाणे पुरवता येतील आणि नागरिकांनाही कबुतरखान्यांचा त्रास होणार नाही, अशी प्रमुख मागणी या शिष्टमंडळाने केली.

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अशा पर्यायी जागांचा शोध घेण्यात येईल. तसेच, सदर कबुतरखान्यांची बाब न्यायप्रविष्ट असल्याने अशा पर्यायी जागांची माहिती माननीय न्यायालयासमोर सादर करण्यात येईल, असे श्री. गगराणी यांनी यावेळी स्पष्ट केले.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *