विधानसभा निवडणुकांचे ज्योतिषशास्त्राचा आधारे विश्लेषण
जितेश सावंत
देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे रणशिंग वाजले आहे. उत्तरप्रदेश,पंजाब ,गोवा,उत्तराखंड व मणिपूर या राज्यांच्या निबडणूक जाहीर झाल्या असून दोन महिन्यांच्या आत येथे नवीन विधान सभा अस्तित्वात येईल.या राज्यातील निवडणुकांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. खास करून उत्तरप्रदेश येथील निवडणूक २०२४ मधील लोकसभा निवडणुकीचा अंदाज या निकालांवरून थोडाफार बांधता येईल. विधानसभा निवडणुकांच्या निकालबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे. ज्योतिशास्त्रानुसार निकालांचे अंदाज मांडण्याचा एक प्रयत्न
सर्वप्रथम देशातील सगळ्यात मोठे राज्य उत्तरप्रदेश -या राज्यात सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. आदित्यनाथ योगी हे मुखमंत्रीपद सांभाळत आहेत. येथे विधानसभेच्या ४०३ जागा आहेत. त्यामुळे सगळेच पक्ष जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी धडपड करणार आहेत. .भारतीय पक्षाचे योगी,समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव ,काँग्रेस पक्षाची सूत्रे उत्तरप्रदेश मध्ये ज्यांच्या हातात आहेत अश्या प्रियांका गांधी व बहुजन समाज पक्षाच्या मायावती हे नेते सध्या तेथील निवडणुकांमधील महत्वाचे घटक आहेत. २९ डिसेंबर १९७१ रोजी जन्मलेल्या योगी आदित्यनाथ यांची पत्रिका कर्क लग्नाची असून सध्या त्यांना शनीची महादशा व राहूचू अंतर्दशा सुरु आहे.अखिलेश यादव यांचा जन्म ०१ जुलै १९७३ रोजी झाला असून त्यांची सध्या केतूची महादशा सुरु आहे. मायावती यांचा जन्म १५ जानेवारी १९५६ रोजी झाला असून त्यांची पत्रिका कर्क लग्न व मकर राशींची असून बुधाची महादशा व मंगळाची अंतर्दशा चालू आहे. काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्याचे प्रयत्न करीत असलेल्या प्रियांका गांधी त्यांची मिथुन लग्न व वृश्चिक राशीची पत्रिका आहे. त्यांची शुक्राची महादशा व बुधाची अंतर्दशा सुरु आहे. बी.जे.पी ,काँग्रेस, एस.पी ,व बीएस.पी या पक्षांच्या मूळ पत्रिका तसेच सध्याची ग्रहस्थिती याचा विचार केला असता सत्ताधारी पक्षाला सत्तेसाठी संघर्ष करावा लागेल,त्यांचा जागेत घट होईल, समाजवादी पार्टी बऱ्याच ठिकाणी मुसंडी मारेल.बीएस.पी ची स्थिती ठीकठाक राहील, काँग्रेसच्या मूळ पत्रिकेनुसार पक्षाची स्थिती एप्रिलनंतर अधिक सुधारणार आहे. या निवडणुकीत मागील निवडणुकांपेक्षा काँग्रेस पक्षाची स्थिती सुधारण्याची शक्यता अधिक आहे.
पंजाब – पंजाब राज्याची रास मकर असून तेथे काँग्रेस पक्ष सत्तेवर आहे येथे विधानसभेच्या ११७ जागा आहेत.काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाने अमरिंदरसिंग याना हटवून चरणजितसिंग चन्नी याना मुखमंत्री केले.चन्नी यांच्या शपथविधी पत्रिकेचा अभ्यास केला असता प्रथम स्थानी केतू समोर राहू, दशम स्थानी रवी/मंगळ ,चतुर्थ स्थानी नेपच्युन /चंद्र अशी ग्रह स्थिती आहे. चरणजितसिंग चन्नी यांचा जन्म ०२ एप्रिल १९६३ रोजी झाला असून त्यांची शुक्राची महादशा व गुरुची अंतर्दशा सुरु आहे. काँग्रेस पक्षाचे तेथील अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचा जन्म २०ऑक्टोबर १९६३ रोजी पतियाला येथे झाला असून त्यांच्या पत्रिकेत शुक्राची महादशा व शनीची अंतर्दशा सुरु आहे.दोन्ही नेत्यांचे वैयत्तिक ग्रहयोग चांगले आहेत.मतभेद बाजूला ठेवल्यास काँग्रेस पक्ष सत्ता राखू शकतो परंतु अंतर्गत वादांमुळे/असंतोषामुळे ( शपथविधी पत्रिकेच्या ग्रहानुसार)काँग्रेस पक्षाची पीछेहाट होऊ शकते. राज्यातील सध्या गाजत असलेले पक्ष आप म्हणजेच आम आदमी पार्टी या पक्षाचा जन्म २० नोव्हेंबर २०१२ साली झाला. सध्या पक्षाची राहूची महादशा व शनीची अंतर्दशा सुरु आहे. सध्याच्या राजकारणात ( कलियुगातील) सत्ता काबीज करण्यासाठी राहूची साथ असणे फार महत्वाचे असते.सत्ताधारी पक्षाचे आसन डळमळीत करण्याचे /आसनाला सुरुंग लावण्याचे सामर्थ्य या ग्रहात आहे. या निवडणुकीत हा पक्ष चांगली कामगिरी करेल.
गोवा – १९ डिसेंबर १९६१ रोजी या राज्याची निर्मिती झाली.राज्याची लग्न रास मकर असून प्रथम स्थानी केतू व अष्टम स्थानी प्लुटोचे वास्तव्य आहे. या राज्यात कायम अस्थिरता राहीली आहे.राज्याची शनी महादशा व बुध अंतर्दशा सुरु आहे. राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असून प्रमुख विरोधी पक्ष हा काँग्रेस आहे. येथे ४० जागांकरिता निवडणूका होणार असून. रवी संक्रमणाच्या कुंडलीनुसार सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जनतेमध्ये रोष उत्पन्न होईल.याचा परिणाम सगळ्या राज्यातील सत्ताधारी पक्षाला होणार असून या राज्यातील सत्ताधारी सुद्धा यास वंचित ठरणार नाही परंतु विरोधी पक्ष काँग्रेसच्या मूळ पत्रिकेनुसार पक्षाला थोडे प्रतिकूल ग्रहमान आहे परंतु पक्षाची कामगिरी निश्चित सुधारेल परंतु सत्तेपर्यंत पोहोचणे तितकेसे सोपे नाही. .राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांची युती तसेच आप व तृणमूलचा गोव्यातील शिरकाव काँग्रेस पक्षासाठी प्रतिकूल आहे. सत्ता स्थापनेसाठी छोट्या पक्षांची मदत घ्यावी लागेल.
उत्तराखंड -येथे विधानसभेच्या ६८ जागांसाठी निवडणूका होणार असून.काही महिन्यांपूर्वी पुष्कर सिंग धामी यांनी०४ जुलै २०२१ रोजी मुखमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली.शपथविधी पत्रिकेचा अभ्यास केला असता अष्टम स्थानी रवी,चतुर्थ स्थानी गुरु आणि नेपच्युन सत्ताधारी पक्षाला प्रतिकूल असे वातावरण या राज्यात आहे . याचा फायदा काँग्रेस पक्षाला मिळू शकतो परंतु ग्रहमानानुसार विरोधी पक्षात सुद्धा गोंधळाचे वातावरण दिसेल. काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांची पत्रिका कर्क लग्नाची असून त्यांची चंद्राची महादशा सुरु आहे. येथे सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच दिसण्याची शक्यता अधिक आहे.
टीप- उपलब्ध माहितीनुसार वरील विश्लेषण केले असून येणाऱ्या काही दिवसातील राजकीय घडामोडीमुळे त्यात थोड्या फार प्रमाणात बदल होऊ शकतो.
दि . २०/१/२०२२, गुरुवार
लेखक ज्योतिषशास्त्राचे तज्ञ आहेत.
ही पोस्ट नव्याने अपलोड करण्यात आली आहे.
ML/ML/MS