न्या. सूर्यकांत होणार भारताचे ५३ वे सरन्यायाधीश
नवी दिल्ली, दि. 24 : हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील पेटवाड या छोट्याशा गावात जन्मलेले न्या. सूर्यकांत लवकरच भारताचे ५३वे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. विद्यमान मुख्य न्यायाधीश बी. आर. गवई २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सेवानिवृत्त होत असून, त्यानंतर जस्टिस सूर्यकांत हे सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतील. ते ९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत या पदावर कार्यरत राहतील.
न्या. सूर्यकांत यांचा जन्म १० फेब्रुवारी १९६२ रोजी हरियाणातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी १९८१ मध्ये राजकीय स्नातकोत्तर महाविद्यालय, हिसार येथून पदवी प्राप्त केली आणि १९८४ मध्ये महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक येथून विधी शाखेची पदवी घेतली. त्याच वर्षी त्यांनी हिसार जिल्हा न्यायालयात वकिली सुरू केली. पुढील वर्षी, १९८५ मध्ये, त्यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी चंदीगड गाठले.
त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ७ जुलै २००० रोजी त्यांची हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता म्हणून नियुक्ती. मार्च २००१ मध्ये त्यांना वरिष्ठ अधिवक्ता म्हणून मान्यता मिळाली. ९ जानेवारी २००४ रोजी त्यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.
५ ऑक्टोबर २०१८ ते २३ मे २०१९ या कालावधीत त्यांनी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य केले. त्यानंतर २४ मे २०१९ रोजी त्यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली.
न्या. सूर्यकांत हे त्यांच्या स्पष्ट विचारसरणी, सामाजिक न्यायावरील कटिबद्धता आणि न्यायालयीन कार्यक्षमतेसाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या न्यायालयीन निर्णयांमधून अनेकदा सामाजिक समतेचा आग्रह धरला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रक्रियेच्या गतीला आणि पारदर्शकतेला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Justice Surya Kant will be the 53rd Chief Justice of India
SL/ML/SL