न्या. सूर्य कांत झाले भारताचे ५३ वे सरन्यायाधीश

 न्या. सूर्य कांत झाले भारताचे ५३ वे सरन्यायाधीश

नवी दिल्ली, दि. २४ : न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी आज भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. या ऐतिहासिक सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी न्यायमूर्ती भुषण आर. गवई यांची जागा घेतली असून त्यांचा कार्यकाळ जवळपास १५ महिन्यांचा असेल. ते ९ फेब्रुवारी २०२७ रोजी निवृत्त होतील. या शपथग्रहण सोहळ्याला भूतान, केनिया, मॉरिशस, नेपाळ, मलेशिया, ब्राझील आणि श्रीलंका येथील सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायमूर्ती आपल्या कुटुंबीयांसह हजर होते. विद्यमान

हिसार, हरियाणा येथे १० फेब्रुवारी १९६२ रोजी जन्मलेले सूर्य कांत यांनी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून प्रवास सुरू करून देशातील सर्वोच्च न्यायिक पदापर्यंत मजल मारली आहे. त्यांनी अनेक महत्त्वाच्या घटनात्मक व सामाजिक विषयांवरील निर्णयांमध्ये सहभाग घेतला आहे. कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय, बिहारमधील मतदार यादी पुनरावलोकन, तसेच पेगासस हेरगिरी प्रकरण यांसारख्या महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांचे योगदान राहिले आहे.

सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करणे हे आपले पहिले व महत्त्वाचे ध्येय असल्याचे स्पष्ट केले. सध्या सर्वोच्च न्यायालयात ९०,००० हून अधिक खटले प्रलंबित आहेत. त्यांनी मध्यस्थी प्रक्रियेला चालना देऊन न्यायदान अधिक जलद व सुलभ करण्याचे आश्वासन दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमावर शुभेच्छा देताना लिहिले की, “न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या शपथविधीला उपस्थित राहिलो. त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा.” राष्ट्रपती भवनातील या सोहळ्यात न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी हिंदीत शपथ घेतली व संविधानाचे पालन करण्याची वचनबद्धता व्यक्त केली.

भारताच्या न्यायव्यवस्थेतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखाली न्यायालयीन सुधारणा व न्यायदान प्रक्रियेत गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *