अखंड आणि बलिष्ठ भारताचे लक्ष साकारणाऱ्या चाणक्याला एकदा पहाच

 अखंड आणि बलिष्ठ भारताचे लक्ष साकारणाऱ्या चाणक्याला एकदा पहाच

मुंबई, दि. २१ ( श्रीकांत सुतार ) काही दशकांनंतर असा माणूस पृथ्वीवर जन्माला आला होता यावरही लोक विश्वास ठेवणार नाहीत असे आईन्स्टाईन चे वाक्य शैलेश दातार यांचे ‘ चाणक्य ‘ नाटक पाहिल्यावर तंतोतंत खरे वाटते.

रंगभूमीवर सध्या सादर होणारे चाणक्य पाहिल्यानंतर आपणही विश्वास ठेवू शकत नाही की अडीच हजार वर्षांपूर्वी असा एक माणूस जन्माला आला होता ज्यांना अखंड भारताचं , सलग भारताचं , बलिष्ठ भारताचं, ओजस्वी भारताचं एक स्वप्न पाहिलं होतं आणि त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी अहोरात्र मेहनत घेऊन अखंड चाली रचून त्या प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यासाठी विविध प्रकारे योजनाबद्ध रीतीने धोरण आखून त्या यशस्वी करून ध्येयपूर्तीचं समाधान तर त्याने मिळवलंच, पण भारताला एक सलग राष्ट्र म्हणून निर्माण करून जनसामान्यांच्या हितासाठी तळागाळातल्या लोकांच्या भल्यासाठी खऱ्या अर्थाने राज्य शासन बहुजन हिताय बहुजन सुखाय या पद्धतीने शासन चालवलं जावं याचा आग्रह धरला. त्यासाठी शासनकर्त्यांना प्रसंगी खडे बोल सुनावून राजाने वैयक्तिक सुखासाठी विचलित होऊ नये म्हणून प्रसंगी कटकारस्थान वर्ज न मानता राज्य राखण्याचा त्याने मनापासून प्रयत्न केला.

सतीश भुता लिखित शैलेश दातार रूपांतरित आणि अभिनीत चाणक्य नाटक पाहताना या साऱ्या गोष्टींची अनुभूती आपण रंगमंचाद्वारे घेतो आणि रंगमंचाद्वारेही स्थळ, काळ, वेळ, अवकाश, लढाई , बंड, विद्रोह, द्रोह याचा एक परिपूर्ण सिनेमॅटिक अनुभव आपल्याला अस्वस्थ करतो. अडीच हजार वर्षांपूर्वी घडत असलेल्या प्रसंगात या विद्यमान काळात घडणाऱ्या घटनांच प्रतिबिंब आपल्याला अस्वस्थ करतं.

जनसामान्यांच्या दृष्टीने अडीच हजार वर्षानंतरही तीच दुःख त्याच घटना राज्यकर्ते आणि शासनकर्ते आपल्या माथी आजही मारून आपली दिशाभूल करण्याचं कार्य किती जोमाने पार पाडत आहेत याची जाणीव आपल्याला थक्क करते.

लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीत त्यासोबत पात्र निवड, त्यांची संवादफेक या साऱ्यातून एक ऐतिहासिक सत्य कलाकृती आपण प्रत्यक्ष जगत आहोत असा भास प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.

हौस म्हणून नवरात्रामध्ये दररोज रंगबिरंगी कपडे बदलावेत तसे पक्ष आणि निष्ठा बदलणाऱ्या या काळात असा एक ध्येयवेडा या भारतवर्षात निर्माण झाला होता हे ठाशीवपणे दाखवून देणारा एक महानायक चाणक्य आपल्यापुढे शैलेश दातार यांनी मोठ्या ताकदीने पेश केला आहे. तेच ते दळण दळणाऱ्या मालिकांच्या काळात आणि लोकांना कसंबसं ओढून ताणून हसवण्यासाठी अश्लीलतेकडे आणि बिभत्सतेकडे घेऊन जाणाऱ्या या काळात अस्सल खणखणीत शब्दोचारांसह एक अस्सल घनगंभीर अनुभव देणारा हा चाणक्य स्वतःला दर्दी अनुभवी आणि चोखंदळ समजणाऱ्या प्रत्येकाने जवळून पाहायलाच हवा.

ML/KA/SL

21 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *