९० वर्षीय वृद्धासाठी न्यायाधीशांनी न्यायालयाबाहेरच केले न्यायदान
पाटणा,दि. १७ : बिहारची राजधानी पाटणा येथे एका ९० वर्षीय शारीरिकदृष्ट्या असक्षम वृद्धाला न्याय देण्यासाठी सीबीआयचे विशेष न्यायाधीश चक्क स्वतः त्यांच्या कारपर्यंत चालत गेले आणि न्यायाची प्रक्रिया पूर्ण केली. न्यायाधीश अविनाश कुमार यांच्या या संवेदनशील कृतीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. संबंधित ९० वर्षीय वृद्ध एका खटल्याच्या सुनावणीसाठी पाटणा येथील न्यायालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत आपल्या कारने पोहोचले होते. मात्र, त्यांचे वाढलेले वय आणि शारीरिक व्याधींमुळे त्यांना कारमधून उतरून न्यायालयाच्या दालनापर्यंत (कोर्ट रूम) चालत जाणे पूर्णपणे अशक्य होते. त्यांची ही हतबलता पाहून सीबीआयचे विशेष न्यायाधीश अविनाश कुमार यांनी केवळ पदाचा मोठेपणा न मिरवता मानवतेला प्राधान्य दिले. सुनावणीसाठी वृद्धाला आत आणण्याऐवजी, न्यायाधीश स्वतः कोर्ट रूममधून बाहेर पडून त्या वृद्धाच्या कारपाशी आले. न्यायालयाच्या इमारतीबाहेर उभ्या असलेल्या त्या कारमजवळ सुनावणीची प्रक्रिया सुरू झाली. विशेष म्हणजे, ही औपचारिक भेट नसून तब्बल ३५ मिनिटे या ठिकाणी कायदेशीर सुनावणी पार पडली.
या प्रकरणाची पाळेमुळे २०११ सालापर्यंत मागे जातात. जमुईचे रहिवासी जय नारायण सिंह यांनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी ‘यूको बँके’कडून सुमारे ४ ते ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, हे कर्ज मिळवण्यासाठी त्यांनी सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचा आरोप बँकेने केला होता. या फसवणुकीच्या तक्रारीनंतर सीबीआयने (CBI) या प्रकरणाची सखोल चौकशी केली, ज्यामध्ये कागदपत्रे खोटी असल्याचे निष्पन्न झाले. तेव्हापासून हा खटला न्यायालयात सुरू होता आणि जय नारायण सिंह यांना सातत्याने न्यायालयाच्या चकरा माराव्या लागत होत्या. आरोपीचे वय आणि आजारपण पाहता त्यांना कोर्टात उभे राहणे अशक्य आहे. यावर न्यायाधीश अविनाश कुमार यांनी कोणताही अहंभाव न ठेवता, नियमांच्या पलीकडे जाऊन मानवतेला महत्त्व दिले आणि स्वतः कारपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला.
SL/ML/SL